नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत आहे. नवी मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या शहरात कोरोनाबधितांची संख्या 80 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांतही झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात शहरात 4 हजार प्रतिबंधित क्षेत्र होते. गेल्या दहा दिवसांत 1 हजारांनी वाढ होऊन आता साडेपाच हजारांवर गेली आहे.
नवी मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम असल्याने सद्य:स्थितीत पहिल्या प्रवर्ग 4773, दुसर्या प्रवर्गात 901 व तिसर्या प्रवर्गात तीन अशी एकूण 5677 प्रतिबंधित क्षेत्र तर मायक्रो 82 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तेच मागील आठवड्यात चार हजार प्रतिबंधित क्षेत्र होते.
कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक जोर दिला जात आहे. सध्याच्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. कुटुंबातील एक व्यक्तीला लागण होताच घरातील बहुतांश सदस्यांना लागण होत आहे. त्यामुळे या प्रतिबंधित क्षेत्रांवर भर दिला जात आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात दोनने वाढ झाली आहे.
दरम्यान, लस कुप्यांअभावी बंद पडलले लसीकरण शहरात सुरळीत सुरू झाले असून आतापर्यंत दीड लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये एक लाखांहून अधिक 45 वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे.
महापालिकेची 28 रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे तसेच 21 खासगी रुग्णालये अशा 49 लसीकरण केंद्रांवर करोना लसीकरण होत आहे. 14 एप्रिलपर्यंत एक लाख 58 हजार 270 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 45 वर्षावरील 1 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दररोज साधारणत: सात हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत दिवसरात्र 24 तास लसीकरण करण्यात येत आहे. तुर्भे येथील रामतनु माता बाल रुणालय आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण होत आहे.
खाटांचा तुटवडा; रुग्णांसह नातेवाइकांची धावाधाव
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढला असून कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खाटा अपुर्या पडू लागल्या आहेत. त्यातही गंभीर अवस्थेतील रुग्णांकरिता आवश्यक अतिदक्षता तसेच जीवरक्षक प्रणालीने सज्ज खाटांचा तुटवडा सर्वाधिक भासू लागला आहे.
पालिकेने या खाटांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी, त्याचे परिणाम दिसेपर्यंत 10 ते 15 दिवसांचा कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत नवी मुंबईत खाटांचा खडखडाट पाहायला मिळणार आहे.
नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या अतिशय वेगाने पसरत आहे. जानेवारीपासून शहरात दररोजचे नवे रुग्ण कमी व्हायला लागले होते. परंतु 15 फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने नव्याने उसळी घेतल्याने स्थिती बिकट झाली आहे. दररोजचे नवे रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, अशा सर्वच प्रकारात कोरोनाने सर्वोच्च संख्या गाठली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावरही प्रचंड ताण असून शहरातील, आजी माजी लोकप्रतिनिधी, तसेच शासन दरबारातल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सामान्य नागरिकांचीही खाटांसाठी पालिकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तसेच पालिकेच्या आरोग्यसुविधेसह खाजगी रुग्णालयातही सातत्याने संपर्क केल्यानंतरही अतिदक्षता खाटा व जीवरक्षक प्रणाली खाटांसाठी अनेक रुग्णालयात नकारच पदरी पडत असल्याने नागरिकांमध्येही प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे.
शहरातील पालिकेने शहरातील बंद केलेली सर्वच कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू केली असून रुग्णांची परफट अतिदक्षता व जीवरक्षक खाटांसाठी सुरू आहे. पालिकेच्या पोर्टलवर काही खाटा उपलब्ध दिसतात, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी खाटाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. कारण खाटांची स्थिती प्रत्येक मिनिटाला बदलत असून पालिका शहरात मोठ्या प्रमाणात अतिदक्षता खाटा व जीवरक्षक प्रणाली खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नाशील आहे.
अतिदक्षता व जीवरक्षक खाटांची संख्या 700पेक्षा अधिक करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून शुक्रवारपासून कामोठे एमजीएम येथे 40 अतिदक्षता खाटा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. पालिकेच्या वाशी येथील कोविड काळजी केंद्रातही 75 अतिदक्षता खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, यासाठी वेळ लागणार आहे.
रुग्णवाहिकाही अपुर्या
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या 24 रुग्णवाहिका तसेच पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या 45 रुग्णवाहिकेत रूपांतर केलेल्या बस अशा एकूण 69 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे या रुग्णवाहिकाही अपुर्या पडू लागल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper