Monday , June 5 2023
Breaking News

कर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड

भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा आता उघडकीस आला आहे. या बँकेत 59 बोगस खाती उघडून 125 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपासकेले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या आणि भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 15) मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकारांशी बोलताना सोमय्या पुढे म्हणाले की, कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आरबीआयने बोलावून घेतले होते. त्यांना ताकीद देऊन यासंबंधी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह आम्ही या विषयाचा पाठपुरावा केला. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात सहकार आयुक्तांशी चर्चा केली होती. आता हा घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे या बँकेवर ताबडतोब प्रशासक नेमावा, अशी आमची शासन आणि आरबीआयकडे मागणी आहे.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कर्नाळा बँकेच्या पनवेल, खारघर, महाड अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. या शाखांमधून गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये व त्याच्याही आधीपासून खातेदारांना त्यांच्या मुदत ठेवींचे पैसे न देणे, चालू खात्यावरील पैसे देण्यालाही विरोध होणे, आरटीजीएससाठी मोठमोठ्या रांगा लावल्यानंतरही ते न होणे, अशा तक्रारी वारंवार आल्या. त्या अनुषंगाने मी व उरणचे आमदार महेश बालदी यांनी मिळून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सहकार खाते व आरबीआयकडे केलेल्या पाठपुराव्याअंती कर्नाळा बँकेच्या कारभारावर आता किमान अंकुश येईल, अशी अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी या बँकेच्या शाखा

आहेत, त्या सर्वच ठिकाणांहून ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. या अनुषंगाने शासनाने किंवा आरबीआयने त्यांना त्यांच्या ठेवींच्या सुरक्षिततेविषयी आश्वस्त करणे आवश्यक आहे, अशी मागणी आम्ही सातत्याने करतोय. प्रशासक नेमल्यानंतरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो व यासंदर्भात त्यांनी आरबीआयचे लक्ष वेधावे, अशी विनंती त्यांना केली आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply