नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मंगळवारी दीपा कर्माकरच्या आगामी बाकू आणि दोहा येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपच्या सहभागाला हिरवा कंदील दाखविला आहे, मात्र भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला पुरुष जिम्नॅस्टसाठी निवड चाचणी घेण्यास सांगितले.
याबाबतचे पत्र ‘साई’ने भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला (जीएफआय) पाठविले आहे. यात ‘साई’ने दीपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या सहभागाला परावानगी दिल्याचे म्हटले आहे. आगामी ऑलिम्पिकसाठीच्या पात्रतेच्या दृष्टीने बाकू आणि दोहाचे वर्ल्ड कप महत्त्वाचे मानले जात आहेत. म्हणूनच भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनकडून काही जिम्नॅस्टची नावे ‘साई’कडे पाठवली होती. स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही ‘साई’ने या नावांना मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे भारतीय जिम्नॅस्टचा दौरा अधांतरी राहिला होता. यातून किमान दीपाचा मार्ग तरी मोकळा झाला आहे. अझरबैजान येथील वर्ल्डकप 14 ते 17 मार्चला, तर कतारमधील वर्ल्डकप 20 ते 23 मार्चदरम्यान होणार आहे.
दीपाच्या दौर्याला परवानगी मिळाल्याचे जीएफआयचे उपाध्यक्ष रियाझ भाटी यांनी सांगितले. जीएफआयने योगेश्वरसिंग आणि आशिषकुमार या आर्टिस्टिक जिम्नॅस्टची नावे दोहा वर्ल्ड कपसाठी पाठवली होती, मात्र ‘साई’ने या नावाला थेट मंजुरी दिली नाही. त्यासाठी ‘साई’ने जीएफआयला निवड चाचणी घेण्यास सांगितले. रियाझ भाटी यांनी ही निवड चाचणी 11 मार्चला घेण्यात येऊ शकते, असे सांगितले. ‘साई’चे प्रोजेक्ट मॅनेजर राजिंदर पठानिया यांना बाकू आणि दोहा या दोन्ही वर्ल्डकपला जायचे असल्याने त्यांनी भारतीय खेळाडूंच्या सहभागाला मंजुरी
दिली नसल्याचा आरोप भाटी यांनी केला होता. त्यामुळे ‘साई’ने लगेचच भाटी यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेतली. यानंतर दीपाचा मार्ग मोकळा झाला. रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा चौथ्या स्थानावर राहिली होती, तर गेल्या वर्षी जर्मनीत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तिने ब्राँझपदक मिळवले होते.