Breaking News

पुन्हा भाजपचेच सरकार? ‘काळजी करू नका; भाजप-सेनाच सत्तेत येईल’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असे शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला होता, मात्र मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील संवाद पूर्णपणे थांबला होता. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला.

बहुमताचा आकडा नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बहुमताअभावी सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

आमदार फुटण्याच्या बातम्यांत तथ्य नाही. या निवडणुकीत अनेक जण पहिल्यांदाच निवडून आल्याने फोडाफोडी होणार नाही. सत्तास्थापनेसाठी जोपर्यंत 145च्या पुढे आकडा जात नाही, तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच राहावे लागेल.

-अजित पवार, आमदार

बाळासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडावी. शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे. एनडीएत फूट पडणे अयोग्य आहे. शिवसेना एनडीएमध्येच पाहिजे.

-रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधी अनुत्सुक?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अद्याप तयार नाहीत, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. ते शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील, पण ते आता शक्य नाही, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. पवार रविवारी दिल्लीत जाणार होते, मात्र काही कारणास्तव ते आता सोमवारी दिल्लीत जातील. दुसरीकडे भाजपनेही सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे.

आम्हीच सरकार स्थापन करणार : भाजप

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच यासंदर्भात मुंबईतील भाजपच्या कार्यालयात तीन दिवसांपासून खल सुरू होता. राज्यात भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, मात्र सरकार स्थापन कसे होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही असाच दावा केला होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply