Breaking News

पनवेलमध्ये भाजपचा जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पनवेल भाजपतर्फे मध्यवर्ती कार्यालयासमोर शनिवारी (दि. 23) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसर्‍यांदा शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व पवार यांना शपथ दिली. हे वृत्त माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयासमोर फटाके फोडून, बँड वाजवून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी बँडच्या तालावर ठेका धरला.

जनसेवेसाठी नव्या जोमाने कार्यरत होऊ या : आमदार प्रशांत ठाकूर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसर्‍यांदा शपथ घेतल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. आपण सर्वांनी जी मेहनत जनतेसाठी घेतली त्यानुसार जनतेनेही कौल दिला होता. दुर्दैवाने सहकारी पक्षाला अवदसा आठवली, पण नियतीने कौल खरा करून दाखविला. आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. त्यांचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व नेतृत्वाचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि जनतेला धन्यवाद देतो असे सांगून जनतेची सेवा करण्यासाठी नव्या जोमाने कार्यरत होऊ या, असे उद्गार आमदार ठाकूर यांनी या वेळी काढले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply