Breaking News

जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह

सामूहिक बलात्कारानंतर हत्येचा संशय

हैदराबाद : वृत्तसंस्था

येथे एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर परिसरात पोलिसांना आढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादनगर परिसरामध्ये या तरुणीची स्कुटी पंक्चर झाली होती. त्यानंतर या तरुणीने तिच्या बहिणीला फोन केला. रात्री सव्वानऊच्या सुमारास तिने मला फोन करुन स्कुटी पंक्चर झाल्याचे सांगितले. तसेच एका व्यक्तीने तिला जवळच्या गॅरेजपर्यंत लिफ्ट देतो असेही तिने फोनवरील संभाषणादरम्यान सांगितले, अशी माहिती तरुणीच्या बहिणीने पोलिसांना दिली आहे. ज्या ठिकाणी या तरुणीची गाडी बंद पडली ते ठिकाण निर्जन होते. या तरुणीने बहिणीशी बोलताना आपल्याला येथे भीती वाटत असून, इथे अनेक अनोखळी पुरुष व मोठ्या प्रमाणात ट्रकही उभे असल्याचे सांगितले होते. त्या वेळी बहिणीने तिला गाडी तिथेच सोडून जवळच्या टोलनाक्यापर्यंत चालत जाण्यास सांगितले. आमचे बोलणे झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तिला फोन केला, तर तिचा फोन स्वीच ऑफ होता, असेही या तरुणीच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे. पोलिसांना गुरुवारी सकाळी या तरुणीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत अढळला. एका स्थानिकाने फोन करून यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या बहिणीने पोलिसांकडे केली असल्याने तिला सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बोलवले. त्यावेळी गळ्यातील लॉकेटवरून बहिणीने मृतदेह ओळखला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर या तरुणीची अंतर्वस्र सापडल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्याचा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नक्की किती नराधम होते या संदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, चौकशीसाठी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या तरुणीला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याचा संशय शादनगरचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. तरुणीची स्कुटी पोलिसांना सापडलेली नाही. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी 10 टीम तयार केल्या आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासून पाहत आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply