
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षाला अध्यक्षांचाच आधार असतो, असे सांगत फडणवीस यांनी ’अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजूने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजूने कमी ऐकावे, अशी विनंती पटोले यांना केली.
फडणवीस म्हणाले की, किसन कथोरे यांचा अर्ज आम्ही मागे घेतला. अध्यक्षांची एकमताने निवड होतेय याचा आम्हाला आनंद आहे. आपला आणि माझा संबंध जुना आहे. आपण विरोधी पक्षात होतात तेव्हाही आपले चांगले संबंध होते. आपल्याला दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या मर्यादा, त्यांच्या क्षमता, आशा-आकांक्षा माहीत आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.
अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांनी महाराष्ट्र विधानसभेचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी सांभाळली आहे. विरोधी पक्षाला अध्यक्षांचाच आधार असतो. अध्यक्षांनी डाव्या कानाने जास्त ऐकायचे आणि उजव्या बाजूला कमी ऐकायचे असते. तुम्ही डाव्या बाजूला पाहाल, तेथेच कान ठेवाल अशी अपेक्षा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्याचे हंगामी अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील यांनी जाहीर केले. तेव्हा पटोले यांनी उभे राहून संपूर्ण सभागृहाला अभिवादन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांनीही पटोले यांना सन्मानाने अध्यक्षपदाच्या आसनावर बसविले.