Breaking News

कशेळे-कर्जत राज्यमार्गावर धुळीचे साम्राज्य

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या कशेळे-कर्जत राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून सिमेंट-काँक्रीटचे बनविले जात असून रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणार्‍या धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहापूर-मुरबाड-कशेळे-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. त्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेला रस्ता खोदला जात असून प्रामुख्याने रस्त्यावर असलेले उंचवटे काढून रस्ता एकसमान बनविला जात आहे. त्यामुळे जागोजागी खोदकाम केले जात असून सध्या या मार्गावरील कडावपासून कशेळे भागात रुंदीकरण व काँक्रीटीकरण केले जात आहे. रस्त्याच्या मध्यभागाच्या एका बाजूने वाहतुक सुरू असून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम सुरू असताना प्रचंड प्रमाणात मातीचे कण व धूळ उडते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. परिणामी त्या रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार धुळीने लालेलाल झालेले दिसून येतात. वाहनचालकांच्या नाकातोंडात व डोळ्यांत धुळीचे कण जात आहेत. रिक्षाने व पालकांसोबत दुचाकीवरून शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होऊन विद्यार्थी आजारी पडत आहेत. 

ठेकेदाराकडून रस्त्याचे काम होताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. रस्त्यावरील धूळ उडू नये यासाठी रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे, परंतु ठेकेदाराकडून अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याची जबाबदारी असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे, मात्र दिवसरात्र सुरू असलेल्या कामांमुळे व सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे धुळीचे लोट उडण्याचे थांबत नाही.

रस्त्यावर सर्व ठिकाणी खोदकाम करीत नसून आम्ही आवश्यक ठिकाणी रस्ता खोदल्यानंतर रोलर फिरविल्यानंतर पाणी मारले जाते. वाहनचालकांनी आम्हाला समजून घ्यावे. काम दर्जेदार व्हावे हाच आमचा उद्देश आहे.-सीमा पाटील, उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply