देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी
केंद्राने राज्याला दिलेल्या 40 हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारचा 40 हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून असून, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तीन दिवसांचे मुख्यमंत्री करण्यात आले होते, तसेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 15 तासांमध्ये त्यांनी हा निधी पुन्हा केंद्राकडे पाठवून दिल्याचा दावा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. हेगडेंच्या या विधानामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी खासदार हेगडे यांचा दावा फेटाळला आहे. हेगडे नक्की काय बोलले माहीत नाही. मला मीडियातूनच ही माहिती मिळाली, मात्र त्यात काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकर्यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही एक नवा पैसाही केंद्राला परत केलेला नाही. केंद्राने तो मागितलेला नाही आणि देण्याचा विषयही येत नाही.
बुलेट ट्रेनसाठीदेखील केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित एक कंपनी सुरू करण्यात आली आहे. त्या प्रकल्पासाठी निधी आलाच, तर तो थेट संबंधित कंपनीकडे जाणार आहे, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळे पुरावे नसताना व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड होणार्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.