Breaking News

मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकरी बाप-लेकाला धक्काबुक्की

मुंबई : प्रतिनिधी

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकर्‍याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’मध्ये जाण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 5) केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. त्यामुळे शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे भासविणार्‍या मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा उघड झाल्याची चर्चा आहे.

या शेतकर्‍याचे नाव देशमुख असे असून, ते पनवेलहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षांची मुलगीही होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून ‘मातोश्री’बाहेर उभे राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये जाऊ देण्याची विनंती केली, मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी देशमुख यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेल्या झटापटीत पोलिसांकडून देशमुख आणि त्यांच्या कन्येला धक्काबुक्की झाली. तेव्हा मला मुख्यमंत्र्यांना भेटू द्या, मला ठार मारणार आहात का, असा आर्त सवाल देशमुख यांनी पोलिसांना केला, मात्र पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू न देता त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली आहे.

देशमुख यांच्यासोबत एक फाइलही होती. बँकेच्या कर्जासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावती देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी रविवारी थेट ‘मातोश्री’त जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज ‘मातोश्री’वर येत असतात. त्यामुळे या लोकांशी असे वागावेच लागते, अशी सारवासारव पोलिसांनी केली आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकर्‍याचे काय काम आहे, असे विचारण्यास सांगून त्याला सोडून देण्याचे आदेश पोलिसांना दिले.

– देशमुख यांची व्यथा बँकेने माझ्यावर आठ लाखांची कर्जे दाखवले. ही सर्व कर्जे खोटी आहेत. पोलिसांनीही माझी तक्रार घेतली नाही. त्यामुळे मी राज्यपालांशी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला. काल वर्षा बंगल्यावर गेलो होतो. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसल्याने आज ‘मातोश्री’वर आलो, पण पोलिसांनी मला भेट दिली नाही. उलट पोलीस ठाण्यात नेऊन कुर्ल्याला आणून सोडले, असे देशमुख यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply