मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता अस्मिता अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणार्या आवश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. जागतिक महिला दिनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या संदर्भातील अस्मिता बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, महिला जोपर्यंत कुटुंबाचा आर्थिक आधार बनत नाहीत तोपर्यंत त्यांचे खर्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. यासाठीच ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत बचत गटांच्या चळवळीला गती देण्यात आली आहे. राज्यात साडेतीन लाख बचत गट स्थापन झाले असून, त्या माध्यमातून 40 लाख कुटुंबे उमेद अभियानाशी जोडली गेली आहेत. बचत गटांना फक्त पारंपरिक बाजारपेठेत अडकवून न ठेवता ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात पालघर, नाशिक, रायगड, पुणे, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, उपसंचालक प्रकाश खोपकर, अनिल सोनवणे यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper