Breaking News

सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

क्वालालंपूर : वृत्तसंस्था
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने गुरुवारी (दि. 9) झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 39 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर 25-23, 21-12 असा विजय मिळवला.
दक्षिण कोरियाच्या खेळाडूविरुद्धचा हा सायनाचा पहिलाच विजय ठरला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत यंगने सायनाचा पराभव केला होता. आता सायनाचा मुकाबला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे.
याआधी बुधवारी भारताच्या पी. व्ही. सिंधू  आणि सायना नेहवाल यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करीत स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. जगज्जेती आणि सहाव्या मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्स्काया हिचा 35 मिनिटांत पराभव केला होता. सिंधूने कोसेत्स्कायावर 21-15, 21-13 अशी मात केली, तर सायनाने बेल्जियमच्या बिगरमानांकित लियाने टॅन हिचा 36 मिनिटांत 21-15, 21-17 असा पराभव केला होता.
साईप्रणित, श्रीकांत गारद
सिंधू आणि सायना यांनी स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली असताना पुरुषांमध्ये बी. साईप्रणित आणि किदम्बी श्रीकांत यांना मात्र सलामीच्या सामन्यातच पराभवाचा धक्का बसला. साईप्रणितला डेन्मार्कच्या रासमस गेमकेने, तर श्रीकांतला चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन टेनने पराभूत केले. साईप्रणित आणि श्रीकांतचा पराभव झाला असला तरी एच. एस. प्रणॉय याने जपानच्या कांटा सुनेयामाचा 21-9, 21-17 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply