Breaking News

बीएसएनएलचा खेळखंडोबा; पोस्टाचे आर्थिक व्यवहार ठप्प, हेलपाटे मारून कर्जतकरांची दमछाक

कर्जत : प्रतिनिधी

मागील काही महिन्यांपासून कर्जतमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. आता तर या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. याचा फटका बँक आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बँका पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत, मात्र बीएसएनएलवरच अवलंबून सरकारी बँका, पोस्ट कार्यालयाला खंडित इंटरनेट सेवेचा सर्वाधिक फटका बसत आहे. कर्जत पोस्टाचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारून दमछाक होत आहे. ज्येष्ठांना दरमहा मिळणारे व्याजाचे पैसेही मिळत नसल्याने आर्थिक कोंडी होते.

आर्थिक ठेव ठेवताना खासगी बँकांपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी बँका, पोस्ट कार्यालयाकडे पाहिले जाते. नागरिक तथा ठेवीदारांकडून त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र इंटरनेटअभावी हक्काचे पैसे मिळण्यास लागणारा विलंब पाहून खासगी बँकाच बर्‍या, असे म्हणण्याची वेळ ठेवीदारांवर आली आहे.

पोस्ट मास्तर तसेच अन्य कर्मचार्‍यांना विचारणा केली असता इंटरनेट नाही, सर्व्हर डाऊन, आम्ही काय करणार अशी हतबलता दाखवतात. काम अडल्याने बिचार्‍या नागरिकांना दररोज पोस्टाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे विदारक चित्र कर्जत पोस्ट ऑफिसमध्ये दिसत आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळालेले लाखो रुपये याच पोस्टात ठेवून त्यापासून दर महिन्याला मिळणार्‍या व्याजावर ते आपली उपजीविका भागवतात, मात्र इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आम्हाला पैसे मिळत नाहीत.

– भीमराव जाधव,

ज्येष्ठ नागरिक, कर्जत

इंटरनेटअभावी नागरिकांच्या होणार्‍या गैरसोयीची दखल घेऊन ही समस्या सोडवावी.

– बळवंत घुमरे,

नगरसेवक, कर्जत

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply