गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले
लखनऊ : वृत्तसंस्था
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळे मुसलमानच काय तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा, पण छातीठोकपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी
(दि. 21) विरोधकांना उद्देशून केले. ’सीएए’च्या समर्थनार्थ लखनऊ येथे घेतलेल्या जाहीर सभेत गृहमंत्री शहा बोलत होते.
या वेळी शहा यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यावर शरसंधान साधले. ’सीएए’वरून होणार्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत. या कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाईल, असा खोटा प्रचार केला जात आहे, पण या कायद्यातील कुठल्याही कलमात तसे असेल तर मला दाखवून द्यावे. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, हिसकावून घेण्यासाठी नाही. राहुलबाबा, ममतादीदी, अखिलेश यादव यांनी आमच्याशी जाहीर चर्चा करावी, असे आव्हान शहा यांनी दिले.
काँग्रेसच्या पापामुळे भारताची धार्मिक आधारावर फाळणी झाली. फाळणीनंतर कोट्यवधी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी हे पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानात राहिले, मात्र उत्तरोत्तर त्यांची संख्या कमी झाली. त्यांचे अनुभव मी ऐकले आहेत. हजारो आया-बहिणींवर बलात्कार केले गेले. बळजबरीने त्यांचा निकाह लावला गेला. मंदिरे, गुरुद्वारा तोडले गेले. अफगाणिस्तानात मूर्ती तोफांनी उडवल्या गेल्या. तेव्हापासून भारताच्या आश्रयाला लोक येत आहेत. अशा लोकांसाठी सीएए ही नवे आयुष्य सुरू करण्याची संधी आहे, असा दावा शहा यांनी केला.
पाकिस्तानात राहणारे हिंदू, शीख भारतात येऊ शकतात. त्यांना सन्मानाने नागरिकत्व देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे, असे महात्मा गांधी यांनी 1947 सालीच सांगितले होते. आमचे सरकार आज तेच करीत आहे, असेही शहा यांनी नमूद केले.