Breaking News

फोन टॅपिंग : फडणवीसांनी आरोप फेटाळले

चौकशी करण्याचे आव्हान

मुंबई : प्रतिनिधी
भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खंडन केले आहे. ’राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे.
मागील सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. महाराष्ट्राच्या गृहखात्याने सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्याच्या सत्ताधार्‍यांनी भाजपला धारेवर धरले आहे. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे, तर फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ’राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. जे आरोप करताहेत त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही आपली संस्कृती नाही. तरीही सरकारला चौकशी करायची असेल, तर ती तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री खुद्द शिवसेनेचेच होते,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फोन टॅपिंगसाठी व व्हॉट्सअ‍ॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून ’पेगॅसस’ ही प्रणाली विकत घेण्यात आली होती. त्यासाठी काही अधिकारी इस्रायलला गेल्याचा आरोप होता. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. ’इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल, तर सरकारने करावी,’ असे ते म्हणाले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply