अलिबाग ः प्रतिनिधी
राज्याचे परिवहनमंत्री आणि कृती समितीने आवाहन करूनही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांचे अनेक ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 29) दुसर्या दिवशीही लालपरी अर्थात एसटी बस या आगारातच असल्याचे चित्र आहे.
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ, थकबाकी, विलीनीकरण आदी प्रलंबित मागण्यांची राज्य शासनाने पूर्तता करावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी बेमुदत उपोषण पुकारले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी संध्याकाळी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल, असे स्पष्ट करीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले, मात्र तरीदेखील अनेक एसटी आगाराच्या ठिकाणी कर्मचार्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करीत आंदोलन मागे घेण्यास कर्मचार्यांनी नकार दिला आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि माणगाव हे एसटी डेपो 100 टक्के संपात सहभागी झाले आहेत, महाड, रोहा, कर्जत हे डेपो अंशतः, तर पेण डेपोच्या अर्ध्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. ापल्या विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटीच्या अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवून आपली परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना राज्य शासनात विलीन करून घेण्याची मागणी मान्य करावी अन्यथा इच्छा मरणास परवानगी द्यावी अशी मागणी केली.
नगरमध्ये एसटी कर्मचार्याची आत्महत्या
नगर, कर्जत ः विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी आंदोलन पुकारले असताना नगरमधील शेवगाव आगारात एका एसटी बसचालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 29) घडली. दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
शेवगाव आगारातील दिलीप काकडे या एसटी कर्मचार्याने बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली. 56 वर्षीय काकडे चालक म्हणून कार्यरत होतेे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत आगारात उपोषणादरम्यान पंढरीनाथ काकडे या चालक कर्मचार्याने शेजारीच असलेल्या झाडाला फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तेथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचार्यांनी त्याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला.
संपाला भाजपचा पाठिंबा
एसटी कर्मचार्यांच्या संपाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग शहर अध्यक्ष अंकीत बंगेरा, अजित भाकरे, समीर राणे, जगदिश घरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अलिबाग बसस्थानकात जाऊन उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचार्यांची भेट घेतली आणि भाजप या आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper