पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल शहराची जुनी वैशिष्ट्ये जपून आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केले. येथील निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक विकास आराखडा विषयावर शुक्रवारी (दि. 4) ऑनलाइन विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार ठाकूर बोलत होते. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख, वास्तुविशारद सतीश कोळवणकर, सँच्युअरी नेचर फाऊंडेशनचे संचालक डॉ. परवीश पंड्या, ठाणे परिमंडळाचे मुख्य संरक्षक रामा राव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्यासह निसर्ग संवेदनशील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर आदर्श बनविण्यासाठी पर्यावरणपूरक आराखडा बनवून या शहराची जुनी वैशिष्ट्ये जपण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सूचना दिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी ज्या संस्था काम करीत आहेत त्यांना शासकीय संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. शाळेतील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. त्यासाठी त्यांना निरनिराळे प्रोजेक्ट द्यावे. त्यांना पर्यावरणाची माहिती होण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या चुका दुरुस्त करीत आपण पुढे जायला हवे, असे सांगून त्यांनी निसर्ग मित्र संस्था आणि सहभागी झालेल्यांचे आभार मानले. डॉ. परवीश पंड्या यांनी हा परिसर आपले दुसरे घरच असल्याचे सांगून पनवेल महापालिका हद्दीत खूप जैवविविधता आहे. ती जपून ठेवण्यासाठी आतापासूनच विकास आराखडा करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील वनस्पती वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीची क्वालिटी वाचवायची आहे, येथे येणारे पक्षी वाचवताना कबुतरखाने तयार करू नयेत. बिल्डिंग, खेळासाठी मैदान ठेवायचे हे आताच ठरवून ठेवले पाहिजेत. वृक्षांची उद्याने बनवू शकतो. निसर्गाची साखळी टिकवण्यासाठी पक्षी, फुलपाखरे आणि किडेही जरूरीचे असल्याचे म्हटले. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पनवेलला येत असतो, असे सांगून वास्तुविशारद सतीश कोळवणकर यांनी वृक्ष कशा पद्धतीने वाढली यावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते. पक्षी तेथे आनंदाने राहत असतात. शहराच्या जैववैविधतेसाठी शहराचा नकाशा तयार करताना तेथील पाण्याचे सोर्स, डोंगर-दर्या लक्षात घेऊन तेथे कोणती झाडे लावावी हे ठरवता येईल. कोणती झाडे कोठे लावावी व वृक्ष डेरेदार दिसण्यासाठी पूर्वनियोजन करून आराखडा तयार करावा. घनकचरा व्यवस्थापनाचा याच्याशी संबंध येत असल्याचे सांगून त्यांनी कचरा म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा कचरा निर्माण होतो असे सांगत ओला कचरा, सुका कचरा, रिजेक्ट वेस्ट (केमिकल आणि औषधी साहित्य) व डेब्रिज (बांधकामातील दगड, विटा) हे त्याचे प्रकार असल्याचे सांगितले. तो वेगवेगळा गोळा करून निर्मूलन केल्यास त्यावर पुनर्वापर प्रक्रिया केल्यास डम्पिंग यार्डची गरज राहणार नाही. त्यासाठी पालिकेने तो वेगवेगळा गोळा करून त्या त्या रिसायकलिंग सेंटरवर नेणे आवश्यक आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन पनवेल महापालिकेने पर्यावरण रक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तिच्या दोन बैठकाही झाल्याची माहिती देऊन विकास आरखडा तयार करताना पर्यावरण रक्षणाबाबत होणार्या चर्चेत निसर्ग मित्र संस्थेने सहभागी व्हावे, असे सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आदर्श पनवेल हे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आज त्याची चांगली सुरुवात झाली असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले. या वेळी त्यांनी मुंबईत भाडे घेऊन जाणारे ट्रक महानगरपालिका हद्दीत कसे डेब्रिज टाकतात त्याचा त्रास होतो. त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तळोजा एमआयडीसीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठीही काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे दोन वर्षांत आलेल्या वादळानेही पर्यावरणाचे नुकसान झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासकीय संस्था या कामात कमी पडत असल्याने सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. महापालिकेचा विकास आरखडा महत्त्वाचा असून त्यासाठी पर्यावरणाचा प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक विकास आराखडा हा चांगला विचार चर्चेला घेतला असून पर्यावरणाचे नुकसान होण्यास मानवी वस्ती जबाबदार असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. पर्यावरणाचा विकास आणि संवर्धन या दोन गोष्टी हातात हात घालून चालण्याऐवजी विकासाची व्याख्या वेगवेगळी असल्याने विरोधात चालताना दिसतात. पनवेल महापालिकेचा आराखडा बनवत असताना ही चर्चा होत असल्याने त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक विकास आराखडा करण्याचा प्रयत्न करून पनवेल शहर निसर्गरम्य बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.