मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या 31 मार्चपर्यत ही बंदी राहणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी
(दि. 20) करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत मोठा निर्णय जाहीर केला. रेल्वे, बसेस आणि बँकींग या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगर प्रदेशात येणार्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, नवी मुंबई, पालघरसह नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व कार्यालये व दुकाने बंद राहणार आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात अन्नधान्य, दूध, औषधे यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल, तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील लोकल आणि बससेवा बंद करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. ती कशी बंद करणार, पण गर्दी थांबलीच नाही, तर लोकल बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे पगार न कापण्याचे आवाहन संबंधितांना केले. ज्यांचे तळहातावर पोट आहे, असे असंख्य कामगार आहेत. बंदच्या निर्णयाने त्यांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या कामगारांचे वेतन कापू नका, त्यांना त्यांचे किमान वेतन द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
Check Also
अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात …