Breaking News

खोपोलीतील नाट्यगृह भाडेवाढ जैसे थे

सहा महिन्यांत एकही प्रयोग झाला नाही

खोपोली : प्रतिनिधी

शहरात कला संस्कृती जोपासनासाठी खोपोली नगर परिषदेकडून छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह  व नाट्यगृह संकुलाची निर्मिती करण्यात आली.  या नाट्यगृहाचे तीन तासाठीचे भाडे दहा हजार होते.

मात्र ऑगस्ट 2018 पासून  दुपटीने भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नाट्यकर्मी आणि नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांत संताप व्यक्त होत आहे. ही भाडेवाढ मुंबई, पुणे व ठाणे शहरातील नाट्यगृहांहुनही जास्त असल्याचे पुरावे देत सदर भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी येथील नाट्यप्रेमी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन केली. मात्र हा विरोध व नाराजी डावलून भाडेवाढ कायम ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील सहा महिन्यांत या नाट्यगृहात एकही नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम झाला नाही. शाहू महाराज सभागृहाचा दैनंदिन खर्च, वीज बिल देणे तसेच स्वच्छता व डागडुजी कायम रहावी, म्हणून खोपोली नगर परिषदेने सर्वांमते हे सभागृह खासगी व्यवस्थापनाला भाडे तत्वावर  चालविण्यासाठी दिली आहे.

मागील दोन वर्षे तीन तासाच्या कार्यक्रमासाठी दहा हजार भाडे निश्चित करण्यात आले होते. मात्र   वर्तमान स्थितीत यात मोठी वाढ करीत ती दहा हजारावरून वीस हजार अशी दुप्पट करण्यात आली.  या दरवाढीचा फटका नियमित नाट्य किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार्‍यांना बसला असून, या दरवाढीमुळे छत्रपती शाहू महाराज सभागृहात एकही नाट्य प्रयोग किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाही. नगर परिषदेने या दरवाढीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी आयोजकांनी लावून धरली आहे. मात्र नगर परिषद भाडेवाढ कमी करण्यास राजी नसल्याने नाट्यकर्मी, आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाट्यसंस्कृती नष्ट होण्याची भीती -नितीन गडकरी

नगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहाच्या भाडेवाढीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चिंता व्यक्त करून, याने नाट्यसंस्कृती नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. खोपोलीत भाडेवाढ झाल्याने येथील कार्यक्रमांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मागील सहा महिन्यांत दोन तीन राजकीय कार्यक्रम सोडल्यास एकही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाटकाचा प्रयोग येथे झाला नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले हे नाट्यगृह सध्या निव्वळ शापीस बनले आहे.

इतर शहरांच्या तुलनेत ही भाडेवाढ अधिक आहे, हे खरे आहे. मात्र या सभागृहाचा महिन्याचा सरासरी खर्च चार लाख तर उत्पन्न सरासरी चाळीस हजार येत आहे. ही आर्थिक तूट कमी करण्यासाठी सदरची भाडे वाढ सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहे. यात बदल करावयाचा असल्यास त्या

बाबत सुधारित ठराव करण्याची आवश्यकता आहे.

-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगर परिषद

भाडेवाढ करून कार्यक्रम संख्या कमी झाली व पालिकेला मिळणारे उत्पन्न घटले. उलट भाडे कमी असताना पालिकेला अधिक उत्पन्न मिळत होते. आम्ही भाडेवाढ कमी करावी यासाठी  निवेदने दिली आहेत. मात्र नगरपालिका कोणताही निर्णय घेत नाही.

-प्रवीण क्षिरसागर व प्रशांत कुलकर्णी, नाट्यप्रेमी, खोपोली

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply