Breaking News

कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढू या!

पंतप्रधान मोदींचे राज्य सरकारांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्र होऊन लढू या. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सोबत असून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 2)येथे दिली. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी अनेक उपयुक्त सूचनाही केल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी लॉकडाऊनवर विशेष भर दिला. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असा आग्रह पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केला, पण सर्व सरकारांनी आपापल्या राज्यांतील नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा योग्य तो पुरवठा करावा, कुणाला त्रास होता कामा नये, असा काळजीचा सूरही पंतप्रधान मोदी यांनी हा संवाद साधत असताना लावला.
देशातील विविध राज्यांमध्ये होणारे मजुरांचे पलायन थांबवणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी सर्व राज्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मजुरांसाठी निवार्‍याची सोय करण्याबरोबरच त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली तसेच मजुरांनी रस्त्यांवर येऊ नये, यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे, असे ते म्हणाले.
देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील अशांना तत्काळ क्वारंटाइन करण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनाही क्वारंटाइन केले जावे. क्वारंटाइन वार्डांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे ते वाढवावेत, अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या.
दरम्यान, पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. ते नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply