Breaking News

कोरोनाविरोधात आता कठोर लढा!

पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; कडक भूमिका घेण्याचे प्रशासन, पोलिसांना आदेश

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित क्षेत्रातील अनेक लोक कोणतीही काळजी न घेता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहेत. अनेक जण मुंबईतून आपल्या गावाला जाण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असा सूर पनवेल येथे बुधवारी (दि. 15) झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत व्यक्त झाला.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनामार्फत विविध उपायोजना करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यात विशेषत: पनवेल आणि उरणमध्ये होणारे कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी शासनाकडून जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, सभागृह नेते परेश ठाकूर आदी उपस्थित होते.        
रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग येत्या काळात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन विविध उपायोजना करीत आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात आतापर्यंत 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 26 आहे. या भागात कोरोनाचा संसर्ग थांबविण्याच्या दृष्टिकोनातून टास्क फोर्स तयार करण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा झाली. शासनाकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत आढावा घेऊन उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत बुधवारी पनवेलमध्ये झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.
या वेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याबाबतही चर्चा करण्यात आली. बाधित क्षेत्रात नागरिकांकडून प्रशासनास अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने पालकमंत्र्यांनी  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आता कडक भूमिका घेण्याचे आदेश प्रशासन आणि पोलिसांना दिले.
शासन कोरोनाविरुद्ध लढताना आणि नागरिकांची  सर्व प्रकारे  काळजी  घेत असताना  नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासन आपली जबाबदारी घेत आहे, आपणही खबरदारी घ्यावी. घरातच राहावे, असे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधींनी या वेळी केले.
नागरिकांनी, अधिक दक्षता घ्यावी : आमदार प्रशांत ठाकूर
आपण सर्वांनी मिळून ठरविले तर घरातील एक व्यक्ती आठवडाभरातील गरजांसाठी एकदाच घराबाहेर पडू शकते. असे केल्यास कोरोना या संसर्गजन्य रोगावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण आणू शकतो. 21 दिवसांत या रोगाची तिसरी स्टेज पसरू नये इतपत समाधान आपण मिळविले आहे. या रोगाला रोखले हे यश मिळवायचे असेल, तर नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. ते पनवेलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव जागतिक स्तरावर आपण पाहत आहोत. रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वात जास्त आणि काही प्रमाणात उरणमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. ते पाहता कोरोनाला कसे थोपवता येईल यादृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार जिथे रूग्ण आढळले ज्या भागात प्रसार होऊ नये, तर अन्य भागात पूर्णपणे प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी बैठकीत वेगवेगळ्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले ज्यात पनवेल, उरण तालुके सोडून बाकीच्या क्षेत्रात 20 तारखेनंतर लॉकडाऊन राहू नये, रेशन कार्डवर सरसकट धान्य एप्रिल महिन्यातच देण्यात यावे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, पण ते या तालुक्यात राहतात अशा लोकांना इथल्या इथेच धान्य देण्यात यावे, यात डाळही देण्यात यावी तसेच कोरोनाच्या चाचण्या जास्तीत जास्त केल्या जाव्यात, असे सूचित केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनच हातावर पोट असलेल्या गरीब, गरजूंच्या वस्त्यांमध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली आहे. यामध्ये अनेकांनी सहकार्य केले. यापुढेही करावे लागणार आहे, पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे शासनाने गोरगरिबांना रेशनच्या माध्यमातून दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply