खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून भाजीपाला, दाणा, मसाले व भाजीपाला मार्केट सुरू झाले असले तरी फळे घेण्यासाठी ग्राहक येत नसल्याने आणि सध्या आंब्याचा सिझन असल्याने आंबा व्यापारी हवालदिल झाले आहेत.
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट हे देशातील सर्वात मोठे मार्केट असल्याने राज्याचा व्यापार देखील या मार्केटवर अवलंबून असतो. कोरोनाची झळ या मार्केटला देखील बसली आहे. दररोज होणारी हजारो कामगार, व्यापारी, खरेदीदारांची गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता असल्याने व मसाला मार्केटमधील व्यापार्याला कोरोनाची लागण झाल्याने गेले चार दिवस मार्केट बंद करण्यात आले होते. त्यात मुख्य कारण गर्दी नियंत्रणात येत नसल्याने मार्केट प्रशासन व पोलीस प्रशासन हवालदिल झाल्याचे दिसून आले होते. मात्र सामाजिक अंतर ठेवण्यासाठी व सुरक्षिततेचे व खबरदारीचा अनेक उपाय घेत अखेर मार्केट सुरू करण्यात आले असले तरी यातून फळ मार्केट बंदच ठेवण्यात आले आहे. यातील मुख्य कारण म्हणजे इतर शहरी भागापेक्षा ठाणे, मुंबईत सर्वाधिक फळे निर्यात होतात. मात्र मुंबई लॉकडाऊन असल्याने खरेदीदारच येईनासे झाले आहेत. त्यामुळे फळ मार्केटमध्ये मालाला मागणी उरलेली नाही. आलेल्या मालपैकी लाखो रुपयांची फळे टाकण्याची वेळ व्यापार्यांवर आली आहे. त्यामुळे मार्केट बंद ठेवण्यापलिकडे काहीच उरलेले नाही. त्यामुळे व्यापार्यांसोबत शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. सध्या आंब्याचा सिजन आहे.
वर्षभर शेतकर्यांकडे व्यापार्यांकडून गुंतवणूक केली जाते. त्यामुळे शेतकरी देखील कर्ज काढून दर्जेदार आंबे पिकवतात. मात्र सध्या मार्केट बंद असल्याने आंबा व्यापार देखील कोलमडण्याची शक्यता आहे. आंबा हे सिजनल फळ असल्याने आंब्याचे फळ तयार होऊन मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहे. मात्र कोरोनामुळे फळ मार्केट बंद असल्याने आंबा उत्पादक संकटात आहेत. तर दुसरीकडे फळ मार्केट जरी सुरू केले तरी मुंबईच बंद असल्याने खरेदीदार मिळतील की नाही याची भीती व्यापार्यांना सतावत आहे.
सध्या काही जुजबी प्रमाणात आंब्याची विक्री होत असली तरी ती नफा मिळवून देणारी नाही. मागणी जास्त नसल्याने सध्या तरी फळ मार्केट बंद ठेवण्यात आले असले तरी इतर मार्केटच्या सुरक्षिततेच आढावा घेऊन फळ मार्केट सुरू
करण्याचा विचार बाजार समितीतून केला जात आहे.
सध्या फळांना मागणी नाही. त्यात मुंबईत सर्वात जास्त निर्यात केली जाते. मात्र लोकडाऊनमुळे मागणी घटली आहे. आणलेल्या मालातील अर्धा माल फेकून खरेदीदाराअभावी फेकून देण्याची वेळ व्यापर्यांवर आली आहे. असे जरी असले तरी आंब्यांसोबत इतर फळांचे मार्केटिंग काही प्रमाणात सुरू आहे. सध्या इतर मार्केट सुरू झालेले असले तरी फळ मार्केटमध्ये आवक नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे. मात्र इतर मार्केटच्या कोरोनाबाबत घेत असलेल्या सुरक्षिततेबाबत आढावा घेऊन येत्या 20 तारखेपर्यंत फळ मार्केट सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे सध्या आंबा उत्पादक व व्यापार्यांचे नुकसान वाचेल. तसेच फळ मार्केट इमारत क्वारंटाईन म्हणून घेऊ नये यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला गेला असून पणनमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे यांच्याकडे देखील मागणी केली आहे.
– संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
RamPrahar – The Panvel Daily Paper