मुरूड ः प्रतिनिधी
येथील गारमबी व नागशेत येथील जंगल भागात पारगाण येथे राहणार्या व्यक्तीने गावठी दारू बनविण्याचा अड्डा निर्माण करून दारू काढण्याचे काम करीत होता. याबाबतची खबर मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.
मुरूड पोलिसांना पारगाण येथे राहणारा व्यक्ती गावठी दारू तयार करीत असल्याची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सदर ठिकाणी धाड टाकण्यात आली. या वेळी शेकडो लिटर दारू नष्ट करण्यात येऊन दारू बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचे पातेले, गूळ, नवसागर, एक लोखंडी टाकी, प्लास्टिक कॅन असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांचा छापा पडताच मुख्य आरोपी फरार झाला आहे. त्याचा मुरूड पोलीस शोध घेत आहेत. फरार आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 खंड ब, क, फ, इ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या समवेत समीर म्हात्रे, राहुल थळे, विलास आंबेतकर, सुनील जाधव आदी पोलिसांनी
सहभाग घेतला.