पाच पनवेलमधील, तर एक श्रीवर्धनचा
पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये पाच आणि श्रीवर्धन तालुक्यात एक असे एकूण सहा नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल, उरण तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता दक्षिण रायगडमध्ये पोहोचला आहे. या नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर पोहोचली आहे.
पनवेलमध्ये आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन जण तक्का परिसरातील असून त्यापैकी दोन व्यक्ती ओलाचालकाशी संबंधित आहेत. यातील एक चालकाची पत्नी आहे. तिसरा रूग्ण किराणा रेशन दुकान व रॉकेल परवानाधारक आहे. या व्यक्तिची पिठाची गिरणीसुद्धा आहे. उर्वरित दोघांमध्ये काळुंद्रे येथील भांडुपला नियमित जाणारा औषध वितरक आणि कामोठे येथील व्यक्ती यांचा समावेश आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 31 असून उलवे नोडमधील चार रुग्णांमुळे पनवेल तालुक्यात 35, तर उरणमधील 2 आणि श्रीवर्धन तालुक्यातील 1 पॉझिटीव्हमुळे रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 38 झाली आहे.
कोरोनाचे यापूर्वी रायगड जिल्ह्यात आढळलेले रूग्ण पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांतील होते. त्यामुळे उर्वरित रायगडकर निश्चिंत होते. त्याचप्रमाणे मागील सलग दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाच्या एकही नवीन रूग्णांची वाढ झाली नव्हती, मात्र त्यानंतर तिसर्या दिवशी एकदम सहा रूग्ण व त्यातही एक श्रीवर्धनमध्ये आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दक्षिण रायगडात खळबळ
श्रीवर्धन : कोरोनाचा रुग्ण आढळल्याने श्रीवर्धन तालुक्यासह दक्षिण रायगडात खळबळ उडाली आहे. हा कोरोनाबाधित मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून तो 4 एप्रिलला श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या आपल्या मूळ गावी आला होता.
मुंबईहून आलेल्या लोकांना होम क्वारन्टाईन करणे गरजेचे होते, मात्र या रुग्णाची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता त्याला गावात दाखल करण्यात आलेे. तीन-चार दिवसांनी अस्वस्थ वाटल्याने तो श्रीवर्धन येथील एका खासगी दवाखान्यात गेला. तेथील डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयात या रुग्णाची लक्षणे कोरोनासारखी वाटल्याने डॉक्टरांनी त्याला तेथून हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या वेळी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित 11 जणांना क्वारन्टाइन करण्यात आले असून भोस्ते गाव सील केले गेले आहे.