Breaking News

लॉकडाऊनमुळे वीटभट्टी व्यवसाय अडचणीत; कामगारांवर उपासमारीची वेळ

वीटभट्ट्या सुरू करण्याची मागणी

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात लघुद्योगांना बसत असून यामुळे पेण तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे वीटभट्टीवर काम करणार्‍या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी ते मे महिन्यात वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतो, मात्र याच कालावधीत लॉकडाऊन सुरू झाल्याने वीटभट्टी व्यावसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीटभट्टीवर काम करणार्‍या आदिवासी बांधवांनाही याचा फटका बसत आहे. वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा, तूस या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने व सिमेंटच्या विटांना मागणी वाढल्याने तयार मातीच्या विटांची किंमत स्थिरावल्याने पैशांची सांगड घालणे वीटभट्टी व्यावसायिकांना कठीण झाले आहे. वीटभट्ट्या बंद असल्या तरी आपल्या कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या घरातील रोजीरोटी चालू राहण्यासाठी वीट व्यावसायिक आदिवासी बांधवांना आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्याची मदत करण्यासाठीही पुढे सरसावत आहेत. एकंदरीतच वीट व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून आता पावसाचेही नैसर्गिक संकट उभे राहिल्याने आदिवासी बांधवांच्या रोजीरोटीचा आणि वीट व्यावसायिकांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून वीटभट्ट्या सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी वीट व्यावसायिक करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply