Breaking News

रायगड जिल्ह्यात युतीच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाइं युतीच्या प्रचाराचा शुभारंभ पनवेल येथे दोन्ही पक्षांतील प्रमुख नेतेगणांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 16) धडाक्यात करण्यात आला. या वेळी बोलताना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी जोमाने कामाला लागावे, असे निर्देश दिले. राज्यात युतीचा निर्णय झाल्यानंतर रविवारी प्रथमच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी, प्रमुख नेतेमंडळींची संयुक्त बैठक पनवेल येथील अशोका लॉन येथे घेण्यात आली. त्या वेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते.

या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे रायगडचे संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वसंत भोईर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे संपर्क नेते दळवी, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, जिल्हा सल्लगार बबन पाटील, शिरिष बुटाला, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यांतील युतीच्या तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद बळकट करण्यासाठी मावळ आणि रायगड मतदारसंघातून दोन्ही खासदार युतीचे निवडून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजे. गाफील न राहता विविध शासकीय विकासाच्या योजना घराघरात पोहोचविल्या पाहिजेत. विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नसल्याने ते आपल्या आपसात मतभेद घडवून आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु कोणताही मनात विचार न ठेवता एकत्रितपणे युतीच्या कार्यकर्त्यांनी काम करून विजय मिळवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम अजित पवार यांनी केले असून. शेेतकर्‍यांच्या आत्महत्या या सिंचन घोटाळ्यामुळे झाल्या आहेत व तो अपहार केलेला पैसा ते आगामी निवडणुकीत वापरण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत मावळची जागा युती स्वतःकडे राखणार आहे व श्रीरंग बारणे प्रचंड मतांनी विजयी होणार, हे निश्चितच आहे, असेही ना. देसाई म्हणाले.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देश पुन्हा एकदा एकजुटीने सक्रीय झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे; तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जोमाने काम करीत असून, या सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना पूर्ण करण्यासाठी व देशाला विघातक शक्तीपासून वाचविण्यासाठी पुन्हा एकदा मोदींना विजयी करण्यासाठी युतीने कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे. शहीद जवांनाची आहुती थांबली पाहिजे. यासाठी दिल्लीतील नेतृत्व प्रखर पाहिजे व ते नरेंद्र मोदीच करू शकतात, असा विश्वास देशवासीयांना असल्यामुळे पूर्ण देश पुन्हा एकदा या निवडणुकीत मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभा राहील, असा विश्वास ना. सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. मावळमधील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेसुद्धा एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व व पाच वेळा उत्कृष्ट संसदपटू असल्याने, तसेच त्यांनी वेळोवेळी लोकांच्या समस्या केंद्राकडे मांडून त्यातून लोकांना न्याय मिळवून दिला असल्याने ते मोठे मताधिक्य घेऊन विजयी मालिका कायम राखतील, यात तीळमात्र शंका नसल्याचेही ना. देसाई यांनी सांगितले.

गेली 20 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध लढा देत आहे. आता यांच्याकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. राष्ट्रवादी म्हणजेच पवारांची लिमिटेड कंपनी बनली आहे. 2019मध्ये अजित पवार यांचाही पराभव केल्याशिवाय युतीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असे सांगून खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, शेतकर्‍यांची करण्यात आलेली हत्या येथील जनता विसरणार नाही. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. तरीही गाफील राहू नका. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभासुद्धा होणार असून, त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असणार आहे, असेही ते म्हणाले.

देशात व महाराष्ट्रात विकासकामे सुरू आहेत. अशाच प्रकारची विकासकामे पनवेल व उरणमध्ये सुरू असून, आगामी काळात होणारे विमानतळ, त्यातून करण्यात आलेले पुनर्वसन, स्थानिकांना 80% रोजगार, तसेच अत्याधुनिक रेल्वेस्थानक व विविध विकास योजना पनवेल परिसरात सुरू असून, या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

शिवसेनाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले की, ही निवडणूक युती एकदिलाने लढवित असून कोणत्याही परिस्थितीत बारणेंना प्रचंड मतांनी विजयी करायचे हा निर्धारच केला आहे. समोर कोण उमेदवार आहे याकडे लक्ष न देता आपण सर्वच युतीचे उमेदवार आहोत या भावनेने सर्वांनी काम करावे व आपली विजयश्री खेचून आणावी.

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, मावळ हा देशातील दोन नंबरचा मतदारसंघ असून, आघाडीच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत पराभव करण्याचे लक्ष ठेवूनच युतीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. राष्ट्रवादीचे नेते हे भ्रष्टाचारातून पैसे कमवायचे व मुजोरी करायचे असे ध्येय ठेवून आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत निवडून देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रथमेश सोमण यांनी केले; तर आभार संपर्कप्रमुख दळवी यांनी मानले. या मेळाव्याला युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात युतीची हवा : रामशेठ ठाकूर

राष्ट्रवादीवाले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. भाजपचे कार्यकर्ते चार पावले पुढे जाऊन घराघरातून मते शोधून काढतील व बारणेंना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात युतीची हवा आहे; तर आघाडीतील शेकाप हा सुपारी घेणारा पक्ष असून, त्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply