Breaking News

जगाला संकल्पाचे सामर्थ्य दाखविले

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना महामारीविरोधातील आपल्या देशाने दिलेला लढा पाहून जगातील मोठमोठे देश अवाक् झाले आहेत. संकल्पाचे सामर्थ्य आपण सार्‍या जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 24) देशभरातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते ई-ग्राम स्वराज पोर्टलचे अनावरण तसेच स्वामित्व योजनेचा शुभारंभही करण्यात आला.
गावापर्यंत सुराज्य पोहचवण्याच्या संकल्पाचे फलित म्हणजे पंचायत राज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी सांगितले. कोरोनाच्या अनुभवाने सर्वांत मोठा धडा शिकवला आहे तो म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. त्याशिवाय अशी संकटे झेलता येणार नाहीत. प्रत्येक गावाने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनासारख्या काळात दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. पंचायत राज जितके मजबूत असेल, तितकी लोकशाही मजबूत होईल आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी सांगितले.
एकेकाळी शंभर पंचायतींमध्येही ब्रॉडबॅण्ड नव्हता, पण आज सव्वा लाखापेक्षा अधिक पंचायतींपर्यंत ब्रॉडबॅण्डची सुविधा पोहचली आहे. वेगवेगळ्या अ‍ॅपमध्ये काम करण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व पंचायतींची माहिती उपलब्ध असेल. गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाइलवर पाहू शकेल. यातून पारदर्शकता वाढेल आणि कामाला गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून संपत्तीचा लेखाजोखा घेतला जाईल. त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होईल. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड अशा राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर स्वामित्व योजना सुरू करणार आहोत. त्यानंतर संपूर्ण देशात ही योजना राबवू, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
स्वामित्व योजनेतून प्रत्येक गावात ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंग होणार आहे. मॅपिंग झालेल्या संपत्तीचे स्वामित्व गावकर्‍यांना मिळेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply