मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर कमविणार्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात गोरगरिब भरकटला आहे. यातच पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसीत निवासी संकुले उभारणार्या अक्षर बिल्डरकडून चावणे, कासप, कराडे खुर्द, सिध्देश्वरी, चांवढोली आदी भागातील गरजू गोरगरीब, कामगार वर्ग यांना 25 मार्चपासून रोजचे दुपारचे अन्नदान केले जात आहे. या अन्नदानाचा जवळपास साडेचारशे ते पाचशे गरजू गोरगरीब लाभ घेत आहेत. पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसीतील कामगार, गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी अक्षर बिल्डरच्या वतीने रोजचे एकवेळ अन्नदान सुरू आहे. लॉकडाऊन वाढल्यास यापुढेही आम्ही गरजू गोरगरीबांना अन्नदान करत राहू, असे मुकेश चौधरी यांनी सांगितले. या वेळी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे दिसून येते. सिध्देश्वरी कॉर्नर ते चावणे परीसरातील कोणालाही उपाशी पोटी झोपू देणार नाही असा संकल्प मुकेश चौधरी यांनी बांधला आहे. या वेळी भाजपचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच विजय मुरकुटे, पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपचे मारुती पाटील, रविंद्र चितळे, उपसरपंच मुकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील आदी उपस्थित होते.