नवी मुंबई ः बातमीदार
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत एपीएमसी मार्केट सुरू राहिले, तर आमची काहीच हरकत नाही, परंतु जर पुन्हा बेपर्वाई झाली तर नवी मुंबईकरांसाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यासाठी मोर्चाही काढू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील कोरोना संसर्गाचे एपीएमसी सर्वांत मोठे हॉटस्पॉट ठरले आहे. शहरातील कोरोनाचा आकडा 1200वर पोहचला असताना यापैकी सुमारे 400 रुग्ण हे एपीएमसी आवारात बाधित झालेले व एपीएमसी आवारात लागण झालेल्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजातील इतर व्यक्तींना बाधा झालेले आहेत. एपीएमसीत व्यापार करताना सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. बाजारात येणार्यांची तपासणी होत नव्हती. कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणार्या एपीएमसीमधील व्यापार पद्धतीवर आमदार गणेश नाईक यांनी आक्षेप घेत या रोगाची साखळी तोडायची असेल तर एपीएमसी बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 11 ते 18 मेदरम्यान एपीएमसी बंद करण्यात आली होती. एपीएमसी पुन्हा सुरू झाल्यावर 19 मे रोजी आ. नाईक यांनी दाणाबंदर बाजाराचा पाहणी दौरा केला.
नवी मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत मंगळवारी 57 कोरोना रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1321 झाली आहे, तर मंगळवारी एकाच दिवसात दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 39वर पोहचली आहे. आजतागायत 8867 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून, एकूण 6762 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर अद्यापही 784 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे समजते.