Breaking News

रायगडसाठी 100 कोटींची मदत तोकडी ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन केली.  
राज्यात भाजपचे सरकार असताना अशा आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय घेण्यात आले, नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून दिली त्याची उदहारणेही त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्या वेळी त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीबाबत बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले.  कलम 370 रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय होता. कलम 370 रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असे बोलले जायचे, पण असे काही घडले नाही. उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरू झाली. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्राचे चांगले निर्णय असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
नुकसानीच्या किमान 75 टक्के मदत करावी
चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांना व मच्छीमारांना त्याचा फटका बसला. फळबागा व घरांचेही प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली 100 कोटींची मदत तुटपुंजी आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना नुकसानीच्या किमान 75 टक्के मदत करावी, तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने रोखीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यासाठी सरकारने कर्ज काढून पैसा उभारावा. राज्यातील जनता अडचणीत असताना सरकारने व्यावहारिक निर्णय घ्यायला हवेत. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असेही ते म्हणाले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply