Breaking News

चक्रीवादळग्रस्तांचे हाल

निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसून पाच दिवस झाले. वादळ केव्हाच गेले, मात्र नुकसानग्रस्तांचे हाल कायम आहेत. काही तास घोंघावलेल्या वादळी पावसाने अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: दक्षिण रायगडला याचा जबर फटका बसला. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेले जिल्हावासी या नव्या संकटामुळे पुरते खचून गेले आहेत.

निसर्गापुढे मानव हतबल आहे. निसर्ग जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा मानवाला त्याच्यापासून केवळ जीव वाचण्याचा प्रयत्न करण्यावाचून पर्याय उरत नाही. याचा प्रत्यय महाभयंकर चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा आला आहे. योगायोग म्हणजे कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाचे नावही निसर्ग होते. एरवी निसर्ग म्हटले की हवाहवासा वाटतो. त्याच्या सानिध्यात मन रमून जाते. मानवी मनाला हर्ष होतो. निसर्ग नावाच्या वादळाने मात्र भलतेच घडवून आणले. खरे तर हे वादळ येणार याची हवामान विभागाला पूर्वकल्पना होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज राहून तयारीही केली होती, पण कुणीही वादळापासून होणारी हानी पूर्णत: रोखू शकले नाही. चक्रीवादळाने जिल्ह्यात दोघांचा बळी घेतला, तर अपरिमित अशी हानी झाली आहे. आधीच कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे सारेच त्रस्त आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनने सर्व व्यवहार कोलमडून पडले आहेत. त्यात आता वादळरूपी नैसर्गिक आपत्तीने कोकणवासीय हतबल झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. राज्य शासनाने वादळात नुकसान झालेल्यांना भरपाई म्हणून 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे, पण ही मदत केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. ते सोडाच काही ठिकाणी दळणवळण, वीजपुरवठा यांसारख्या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. आता पावसाळा सुरू होत आहे. तेव्हा पुन्हा वरुणराजाने कृपा केली तर.. या चिंतेने नुकसानग्रस्त लोक मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. राज्य शासनाने याचा गांभिर्याने विचार करून वादळग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे मूळ नुकसानग्रस्तापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. अनेकदा असे पाहाण्यात येते की अशा प्रकारच्या निधीचा विनियोग नीट होत नाही. कधी-कधी त्यावर ढपला मारल्याचीही उदाहरणे आहेत. तसे होता कामा नये. ज्यांचे वादळात खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना सर्वतोपरी भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आधी नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे. याकामी राज्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून प्रशासनाला कामाला लावून त्यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला पाहिजे. ज्यांचा वादळात जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान कधीही न भरून येणारे आहे, परंतु त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीतून दिलासा देता येऊ शकेल. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरांचे, मालमत्तेची हानी झालेली आहे त्यांचा संसार उभा करण्यावर राज्य शासनाने प्राधान्य द्यावे. कोकणात मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येने परतल्याने आधीच कोरोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढत आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासीयांना जोरदार तडाखा दिला आहे. वादळी पावसाने रायगड जिल्ह्यात जबर नुकसान झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या जिल्ह्याने आजवर अशी अनेक संकटे झेलली आहेत. लढवय्यांची परंपरा असलेली रायगडची जनता दुहेरी संकटामुळे मात्र खचली आहे. ते पाहता राज्य शासनाने लक्ष केंद्रित करून रायगडकरांना सावरणे आवश्यक आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply