उरण : वार्ताहर
उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने उरणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रानसई धरणाची या वर्षी पाण्याची पातळी दोन मीटर जास्त आहे. त्यामुळे जूलै अखेरपर्यंत उरणकरांना हे पाणी पुरणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.
उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1970च्या दशकात हे धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे 6-8चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणामुळे उरण तालुक्यातील जनतेची तहान भागणार असल्याने त्यावेळेस विंधणे, दिघोडे, कंठवली, भोम, रानसई आणि चिरनेर या गावातील शेतकर्यांनी आपल्या कवडीमोल भावाने एमआयडीसीला दिल्या होत्या. या धरणात दहा मिलियन क्यूबिक मिटर पाणीसाठविण्याची क्षमता आहे. मात्र गेली कित्येक वर्षे या धरणातील गाळ काढला गेला नसल्याने हे धरण अर्धे अधिक गाळाने भरले आहे. सध्या या धरणात 15 जून अखेर 2-250 मिलियन क्यूबीक मीटर पाणीसाठा शिल्लक आहे.
या रानसई धरणातून उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएजीसी, बीपीसीएलसारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात औद्योगीक विकास झाल्याने येथे येणार्या या प्रकल्पांना या धरणातूनच पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या उरण तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि तालुक्याचा औद्योगीक विकास झाल्याने उरण तालुक्याला पाणीपुरवठ्याचे दुष्टीने हे धरण अपूरे ठरत आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.उप अभियंता आर. डी. बिरंजे यांना विचारणा केली असता- गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक एमसीएम पाणीसाठा जास्त शिल्लक आहे. यावर्षी आम्ही उरणकरांवर कोणतीही पाणी कपात लादली नव्हती तरी देखील योग्य नियोजनामुळे पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी धरणात 25.81मीटर उंची पर्यंत 1.377 एमसीएम पाणी साठा होता. यावर्षी हा पाणीसाठा 2-250 एमसीएम पाणी शिल्लक आहे. रानसई धरण परिसरात 194 एमएम पावसाची नोंद झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper