Thursday , March 23 2023
Breaking News

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई ः प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेले विख्यात संगीतकार व गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 ते 29 मार्च या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र, पेंटिंग्ज, ऑडिओ-व्हिडीओ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके व ज्येष्ठ गायक व लेखक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते 25 मार्च रोजी सायं. 6.30 वाजता होणार आहे. सांस्कृतिक जगतातील मानबिंदू असलेल्या संगीतकाराचा सांगीतिक प्रवास या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगण प्रांगणात दररोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 25 मार्च रोजी ग. दि. माडगूळकर विरचित व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायणाचे प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके सादरीकरण करणार असून आनंद माडगूळकर निरुपण करणार आहेत. श्रीधर फडके व आनंद माडगूळकर द्वयींचे गीतरामायण सादरीकरण ही मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

26 मार्च रोजी रघुलीला एंटरप्रायझेस, मुंबई निर्मित ‘शब्द सूर त्रिवेणी’, 27 मार्च रोजी कलाअर्पिता, पुणे निर्मित ‘स्वयंवर झाले सीतेचे’ ही नृत्य नाटिका, 28 मार्च रोजी संवादसेतू, पुणे निर्मित ‘इथेच टाका तंबू’ या बाबूजी व गदिमांच्या स्वरयात्रेचा कार्यक्रम, तसेच 29 मार्च रोजी षड्ज पंचम, मुंबई निर्मित ‘अशी पाखरे येती’  या सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. 26 मार्च रोजी सुधीर फडके निर्मित व संगीतबद्ध केलेल्या ‘वीर सावरकर’, 27 मार्च रोजी ‘जगाच्या पाठीवर’ तसेच 28 मार्च रोजी ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटांचा महोत्सव मिनी थिएटर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे रोज दु. 3.30 वाजता होणार आहे.

या गानमहर्षींच्या जीवनावर आधारित 25 ते 29 मार्च या कालावधीत दुपारी. 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत आर्ट गॅलरी, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे चित्रांकित आलेख दर्शविणार्‍या चित्रांचे प्रदर्शन, तसेच याच कालावधीत कलांगण, रवींद्र नाट्य मंदिराचे प्रांगण येथे नामवंत लेखकांच्या दर्जेदार साहित्याचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. जन्मशताब्दीनिमित्त बाबूजींच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याने कार्यक्रम व प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांनी केले आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply