Breaking News

पंतप्रधान मोदींमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
  • नागोठणे विभागातील कार्यकर्ते भाजपमध्ये

नागोठणे : बातमीदार
राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहिल्या, केव्हा केव्हा तर वाटले राजकारणात का आलो? परंतु 2014 सालापासून देशाचे राजकारण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे राजकारण करून देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवित आहेत. त्यामुळे जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे खंदे कार्यकर्ते, भाजपचे प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ ठाकूर यांच्या सहकार्याने नागोठणे विभागातील वांगणी, आमडोशी, पाटणसई, कानसई, तामसोली आदी पाच गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या असंख्य कार्यकर्ते व महिलावर्गाने रविवारी (दि. 9) भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नियोजनाखाली रायगड लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचित केले. त्याचप्रमाणे सर्व प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून आपल्याला भाजपमध्ये प्रवेश केल्याचा कधीही पश्चाताप होणार नाही. तुमचा विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागोठणे येथील टीएसके सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप पेण विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, मारुती देवरे, श्रेया कुंटे, सरचिटणीस मिलिंद पाटील, राजिपचे माजी सभापती डी. बी. पाटील, पेण पं. स.चे माजी सभापती संजय भोईर, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप तालुका सरचिटणीस आनंद लाड, माजी उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, ज्येष्ठ नेते तानाजी देशमुख, सिराज पानसरे, संतोष लाड, सुभाष पाटील, नवनिर्वाचित भाजपचे युवा नेते एकनाथ ठाकूर, निमिष वाघमारे, विठोबा माळी, ज्ञानेश्वर शिर्के, मोरेश्वर म्हात्रे, अपर्णा सुटे, प्रियांका पिंपळे, निलिमा राजे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार धैर्यशील पाटील या वेळी म्हणाले की, मी काळाची पावले ओळखून तसेच पक्षात काम करीत असताना आपल्याला सार्वजनिक हित साधता आले पाहिजे या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडी घडल्या त्याचा परिणाम सकारात्मक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा एवढा पॉवरफुल आहे की, अनेक जण भाजपमध्ये आले आहेत. प्रतिष्ठा, वैभव पुढे नेणार्‍या नेत्यासोबत आलो याचा मला अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश जगात एक नंबर देश असेल. या पुढील काळात राज्यात विरोधी पक्ष राहणार नाही. आपल्याला जि.पं., पं.स. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत, असे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.
नागोठणेजवळील शिहू विभागातील नेतृत्व, गोरगरिबांचे कैवारी प्रसाद भोईर यांनी काही दिवसांपूर्वी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे, शिहु विभागासह पेण तालुक्यातील विविध पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यापुढेही नागोठणे विभाग व पेण तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून संपूर्ण परिसर भाजपमय झालेला दिसेल.

Check Also

माणगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार

माणगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी (दि.1) माणगाव …

Leave a Reply