आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही चित्रपट रसिकांनी मला व्हॉटसअॅपवर एक प्रश्न पाठवला, ‘शोले’ तब्बल एकवीस रिळांचा, आजच्या भाषेत तीन तास अठरा मिनिटांचा होता, तर मग त्याच्या खेळाच्या वेळा काय होत्या?
प्रश्न खरंच महत्त्वाचा. त्यातही आजच्या मल्टीप्लेक्स युगात सकाळी साडेआठ नऊ ते रात्री साडेअकराचा मिडनाईट मॅटीनी शो असे खेळ असतात नि काही मुव्हीज शंभर मिनिटांच्या असतात. त्यात तर हा प्रश्न खूपच महत्वाचा. पूर्वी चित्रपटाच्या वेळेचे गणित पक्के असे. दक्षिण मुंबईतील चित्रपटगृहात सकाळी साडेअकरा वाजता मॅटीनी शो (जुने चित्रपट प्रदर्शित करण्याच्या या प्रथेत मग नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागले, पण मॅटीनी शोची इमेज व वैशिष्ट्य कायम राहिली) व दिवसा तीन, सहा व नऊ असे तीन खेळ. चित्रपट मोठा असेल तर वेळ मागेपुढे होई. श्याम बेनेगल, बासू भट्टाचार्य वा बासू चटर्जी दिग्दर्शित चित्रपट चौदा रिळांचे असत आणि त्यांचे अनेक चित्रपट मॅटीनीलाच प्रदर्शित होत. दिवसा तीन खेळ असतील तर साडेतीन, साडेसहा व साडेनऊ अशी वेळ असे. दिग्दर्शक मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा यांना आपण पब्लिकला भरपेट, भरगच्च मसालेदार मनोरंजक चित्रपट देण्याची हौस मौज, त्यांचे पिक्चर अठरा रिळांचे असत. सेन्सॉर सर्टिफिकेटवर ते वाचताच पब्लिकमधून हमखास टाळी येई. जणू नेहमीच्याच तिकीटावर जास्त पिक्चर पहायला मिळणार. त्या मनोरंजक चित्रपटाची वेळ दुपारी अडीच, सहा व नऊ अशी साधारण असे. उपनगरातील चित्रपटगृहात कायमच बारा, तीन, सहा, नऊ अशी हुकमी वेळ असे. याच नावाचे मराठीत पुस्तकदेखील प्रकाशित झाले आहे.
‘शोले’च्या वेळेस मिनर्व्हात दीड, साडेपाच व रात्री नऊ वाजून वीस मिनिटे अशी होती. सुरुवातीस ती अडनीळी वाटे, मात्र पिक्चर हिट होताच ती माहितीची झाली.
आपली ’सिनेमा प्रेक्षक संस्कृती’ खूप जगावेगळी आहे असे मी कायमच अभिमानाने सांगतो. आपल्याला आपल्याकडे अनेक प्रादेशिक भाषेत आणि हिंदीत निर्माण होत असलेल्या चित्रपटाचे विशेष कौतुक हवेच, कारण ते आपल्याकडील बहुसांस्कृतिक, सामाजिक, बदलत्या माध्यम व वातावरणातून वाटचाल करतेय.
आता हेच बघा ना, तुम्ही पूर्वी एकाद्या तालुक्याच्या ठिकाणच्या अथवा अगदी गावातल्या सिनेमा थेटरात रात्रीचा शो पहायला गेला असाल तर तुमची एक आठवण नक्कीच असेल, सिनेमाचा क्लायमॅक्स (अर्थात शेवट) जस जसा शेवट येत असतानाच एक लक्ष असे की, सिनेमा संपल्यावर घरी जायला टमटम (सहा सीटची रिक्षा) मिळेल काय? स्वत:ची सायकल अथवा स्कूटर असेल तर असा प्रश्न पडत नसे, पण तसे नसेल तर? याच गोष्टीला ’दुसरी बाजू’ही आहेच. ती म्हणजे प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील थेटरवाले रात्रीचा खेळ बारापूर्वीच संपेल याची काळजी घेत आणि समजा, चित्रपटच त्यापेक्षाही जास्त लांबीचा असेल तर? तर ते बिनदिक्कतपणे ’आपल्या अधिकारात’ त्यातील काही चक्क कापत… त्यांची चित्रपट संकलन कला जगावेगळी, पण चित्रपट वेळेवर संपवायला हवी अशी. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील हाही एक अजब फंडा.
आमिर खान निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’लगान’ (2001)ला आपण अशीच कात्री लावली आणि रात्री बारा वाजता ’शेवटचा खेळ’ संपेल हे पाहिले. इतकेच नव्हे; तर या पिक्चरच्या एकूणच लांबीमुळे माझ्या टॉकीजमध्ये दिवसा चार शो बसत नव्हते, पण आम्हीच काही दृश्ये कापल्याने ते शक्य झाले असे चक्क असाच एक ग्रामीण भागातील थेटरवाला त्या काळात नाझ चित्रपटगृहाच्या इमारतीतील एका वितरकाच्या कार्यालयात मला भेटला असता ’जणू काही यात आश्चर्य वाटण्याजोगे’ काहीच नाही अशा पध्दतीने माझ्या चेहर्यावरील आश्चर्याकडे दुर्लक्ष करीत मला सांगत होता आणि आपल्याकडील ’थियटर संस्कृती’चा आणखी एक झक्कास प्रत्यय आला. गोष्ट छोटी वाटते, पण महत्त्वाची आहे.
असे काही ऐकले की, माझे कुतूहल वाढते आणि मग काही गोष्टी जाणून घ्याव्याश्या वाटतात. मग समजले की ती दीर्घकालीन परंपराच आहे. नेहमीपेक्षा जास्त लांबीचे चित्रपट हे शहरातील थेयटर संस्कृतीत ठीक आहे, पण शहरापासून जेवढे दूर दूर जात राहू तर ’त्याच चित्रपटाची लांबी कमी कमी होत जाते’, कारण शोची दिवसा चार खेळ आणि वेळ सांभाळायची असते. भले इकडे मोठ मोठ्या परिसंवादात, इव्हेन्टसमध्ये चित्रपटाच्या आशय, बदलते तंत्रज्ञान, वितरण, मार्केटिंग, पूर्वप्रसिद्धी, बजेट यावर भली मोठी गंभीर चर्चा होत असेल. दूरवरच्या प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचण्याचे जग वेगळे.
मल्टीप्लेक्स व डिजिटल युगापूर्वीची आपल्या देशातील चित्रपटाच्या खेळाची हुकमी वेळ काय होती हे मी सुरुवातीलाच सांगितले. मी तीनच्या शोला जातोय, मी लास्ट शो पहायला असे बोलण्याची सामाजिक सांस्कृतिक परंपराच होती. एखाद्या थिएटरमध्ये एकच चित्रपट चारही खेळासाठी असेल तर ’दिवसा चार खेळ ’ असे एवढेच दिले जाई आणि समजा, हीच वेळेची चौकट जेव्हा मोडली जाई?
राज कपूर अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ’संगम’ (1964)ची लांबी फारच आहे आणि म्हणूनच त्याला दोन मध्यंतर आहेत असे ’संगम’च्या पूर्वप्रसिध्दीतच स्पष्ट दिसू लागताच त्याच्या शोच्या वेळा कशा बरे असतील, याबाबत कुतूहल निर्माण झाले होते आणि मग त्याच्या रिलीजच्या वेळी समजले की, दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरचे उदघाटन ’संगम’ने होत असून शोच्या वेळा आहेत, दहा, दुपारी साडेतीन आणि रात्री आठ वाजता. सिनेमा चार तासांचा असल्याने या वेळा अगदी स्वाभाविक होत्याच. भायखळ्याच्या जयहिंद टॉकीजमध्ये दिवसा चार खेळ अशी प्रथा असल्याने तेथे ’संगम’साठी वेळा होत्या, सकाळी पावणेआठ, दुपारी बारा वाजता, मग सव्वाचार वाजता व रात्री नऊ वाजता. एकदा हे वेळेचे गणित समजले, पिक्चर पब्लिकला आवडला आणि मग ’संगम’ पहायला जाण्याची वेळ पब्लिकच्या माईंडमध्ये सेट झाली. यश बरेच काही घडवते ते हे असेही आणि यशाच्या गोष्टीत फार रंजकताही असते.
अशा मोठ्या लांबीच्या चित्रपटाबाबत असे नेहमीच घडते. सहज उदाहरण म्हणून ही बघा, ’सूरज’, मेन थिएटर नॉव्हेल्टीत दुपारी दोन, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री साडेनऊ, बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ’दास्तान’, नॉव्हेल्टीत पावणेदोन, साडेपाच आणि नऊ, तर रेक्स आणि लोटसमध्ये सकाळी साडेदहा, दुपारी दोन वाजता, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री नऊ वाजता. असे दिवसा चार खेळ. राज कपूर दिग्दर्शित ’बॉबी’. मेट्रोत दुपारी सव्वादोन, सायंकाळी पावणेसहा आणि रात्री सव्वानऊ. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’मुक्कदर का सिकंदर’ अलंकारला दोन, पावणेसहा आणि सव्वानऊ. रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित ’गांधी’ रिगलमध्ये इंग्रजीत बारा, सव्वाचार आणि साडेआठ वाजता. तीनच खेळ, तर हिंदीत प्लाझा थिएटरमध्ये सकाळी दहा, दुपारी पावणेदोन, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री सव्वानऊ.
यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच की, वीसपेक्षा जास्त रिळाच्या चित्रपटाच्या खेळाच्या वेळा या अशा नेहमीची चौकट मोडणार्या असत. राज कपूर दिग्दर्शित ’मेरा नाम जोकर’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शान’, सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ’हम आपके है कौन’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’लगान’, करण जोहर दिग्दर्शित ’कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या वेळीही शोची वेळेची खेळी अशीच होती. ’मेरा नाम जोकर’ तर दोन मध्यंतरसह पडद्यावर आला (18 डिसेंबर 1970) आणि त्याच्या वेळा त्यानुसार होत्या, पण फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ’जोकर पडला पडला’ अशी हाकाटी दिल्याने तो बराचसा कापून एका मध्यंतरचा करण्यात आला आणि मॅटीनी शो, रिपीट रनला कायमच गर्दीत चालला.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण त्या काळात अशा पद्धतीने ’सिनेमाच्या शोची वेळ’ नेहमीपेक्षा वेगळी असेल तर आपल्याला जास्त मोठा चित्रपट पहायचा अशी एक प्रकारची मानसिकता तयार होई आणि अशी काय बरे थीम असेल, असे आपल्याला काय काय बरे पहायला मिळतेय याबाबत उत्सुकता वाढे. एक प्रकारे ते गरजेही असते. ते दिवसच वेगळे होते. शोची वेळ हा अनेक लहान मोठ्या गोष्टींना जन्म देणारी असे. त्यात पुन्हा दुपारचा खेळ दोन वाजता असेल तर आपोआपच मॅटीनी शोची वेळ अकराची करावी लागे. या सगळ्यात काय व्हायचे माहित्येय? मॅटीनी शो साडेअकराचा, पहिला खेळ तीनचा, दुसरा सहाचा आणि रात्रीचा साडेनऊचा असे सरावाचे टाईम टेबल पक्के असणारे रसिक प्रेक्षकांची अनेकदा तरी चित्रपटाची सुरुवातच चुकत असे अथवा त्यांना हा चित्रपट नंतर बघू असा तत्काळ निर्णय घेत अन्य थिएटरवर जावे लागत असे. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ’चानी’च्या जाहिरातीत अगदी ठळकपणे दिले होते, ’वेळेपूर्वी या, अगोदर आलेल्यांना डिस्टर्ब करू नका’. इरॉसमध्ये या चित्रपटासाठी शोची वेळ होती, साडेबारा, साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ.
अशा या चित्रपटाच्या खेळाची वेळ या संस्कृतीत ’मेरी आवाज सुनो’च्या वेळी नियमित शोमध्ये भर पडली. एका दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची रिमेक असलेल्या या चित्रपटात प्रचंड हिंसा असल्याच्या कारणास्तव त्यावर बंदी येणार अशा बातमीने वादळ निर्माण केले आणि याचाच व्यावसायिक फायदा उठविण्यासाठी या चित्रपटाचे शो वाढवताना सकाळी नऊचा ’जादा खेळ’ लावला गेला. मी स्वत: मिनर्व्हात असा सकाळी नऊ वाजताच्या शोला गेलो. बंदी आलीच तर पहायचा राहून जाईल याची भीती वाटत होती हो आणि मग मी हा चित्रपट पहायला असा भाव खात गिरगावात फिरलो.
मध्य आणि उत्तर भारतातील अनेक छोट्या शहरात अनेक मोठ्या चित्रपटांचे राऊंड शो होत. ते रुजलेच होते. विशेषत: फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट भारी आला रे आला थिएटरवर गर्दी उसळे आणि कुठे जमलचं तर रात्री बाराचाही अथवा सकाळी सहा वाजल्यापासून शो सुरु. कधी एकदा हा सुपर हिट पिक्चर पाहतोय अशी जबरा वातावरण निर्मिती व्हायची. आपल्या देशात चित्रपट फक्त पडद्यावर राहत नाहीत याचाच हा सज्जड पुरावाच जणू. विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ’माहेरची साडी’च्या बाबतीतही पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हेच घडले. एक शो संपतोय तोच पुढचा असा फंडा आणि अशा क्रेझच्या चौकटीतील बातम्या सिनेमाला आणखी चर्चेत ठेवत व ते योग्यच असते. पिक्चर रिलीज झाल्यावर त्याची जास्त जोरशोरसे प्रसिद्धी व्हायला हवी हे सर्वकालीन सत्य आजची चित्रपटसृष्टी जवळपास विसरलीय. चित्रपट प्रदर्शित झाला एवढेच पुरेसे नसते, हे
जुन्या काळातील फिल्मवाल्यांना चांगलेच समजलेले.
मल्टीप्लेक्स युगात सकाळपासूनच शो सुरु होतात आणि रात्री उशीरापर्यंत असतात, पण त्यातले फर्स्ट शो फर्स्ट शोचे वातावरण, त्यातले थ्रील आणि शोच्या वेळेतील धक्के हे सगळेच हरवलेय. कोणत्याही वेळेचा शो पाहिला तरी काय फरक पडतोय अशा गोष्टीपर्यंत येऊन पोहचलोय. मल्टीप्लेक्सबाहेर कायमच शुकशुकाट दिसतो. थिएटरभोवतीची गर्दी ही गोष्ट सोशल मीडियात तेव्हाचे फोटो पाहताना दिसतेय.
सिनेमाची वेळ काय होती आणि आता काय वेळ आली असे तर नव्हे ना? फिल्मवाल्यांच्या भाषेत सांगायचे तर पिक्चर हिट असेल तर बोलणार ’टाईम अच्छा चल रहा है’ आणि पिक्चरला पब्लिकने नाकारले तर त्यांचे ठरलेले असते, बुरा टाईम चल रहा है… असे काहीही असले तरी कोणावर कशी वेळ आणायची हे पब्लिकच्या हातात असते.
शोले पब्लिकने असा व इतका डोक्यात व डोक्यावर घेतला की त्याची कायमच चलतीची वेळ राहिली. मनोरंजक उपग्रह वाहिनी, यू ट्यूब व ओटीटी यावर कोणत्याही वेळी चित्रपट रसिक शोले पुन्हा पुन्हा पाहण्यास उत्सुक आहेत हे यश तर कशातही मोजता न येणारे…
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper