Breaking News

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कुंडलज वांजळे येथील कुटुंबाला मिळाला न्याय

कर्जत ः बातमीदार – बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर महिलेचे बाळ मृत अवस्थेत जन्मल्यानंतर महिलेला झालेला रक्तस्त्राव रोखण्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अयशस्वी ठरले होते. त्यात दोघांचे बळी गेल्याने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती. दरम्यान, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून दोन महिन्यांनी सदर डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 एप्रिल रोजी गरोदर असलेल्या प्रिता जसपाल सिंग उर्फ सपना प्रकाश ठोंबरे यांच्या पोटात कळा येत असल्याने त्यांना माहेरच्या मंडळींनी बाळंतपणासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉ. रामकृष्ण पाटील यांनी अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे रुग्णाला तुम्ही घरी न्या, असे सांगितले. तीन दिवसांनी म्हणजे 3 मे रोजी त्या गरोदर महिलेला पुन्हा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. पाटील यांनी तपासणी करून बाळंतपण नैसर्गिक होईल, असे सांगून गरोदर महिलेला बाळंतपणासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. दुपारी बाराच्या सुमारास गरोदर महिलेला नेण्यात आल्यानंतर दुपारी 2 वाजता त्यांनी मृत बालकास जन्म दिल्याचे डॉ. पाटील यांनी बाहेर येऊन महिलेच्या नातेवाइकांना सांगितले. तब्बल अर्ध्या तासाने सदर महिला शुद्धीवर आली असता आपल्या नातेवाइकांशी बोलणे केले, परंतु दोन तास झाले तरी बाळंतपण झालेल्या महिलेचा रक्तस्राव थांबत नव्हता.

गरोदर महिलेचे बाळंतपण नैसर्गिक करतो, असे सांगणारे डॉ. रामकृष्ण पाटील यांनी रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. पाटील यांनी या कालावधीत पेशंटला हलवायचे आहे असे सांगून नातेवाइकांकडून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठी डॉ. पाटील यांनी बाळंतपणानंतर रक्तस्त्राव सुरू असलेल्या महिलेला ऑक्सिजनची नळकांडी लावून पनवेल येथे जाण्यासाठी प्रवास सुरू केला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून पेशंट बाहेर हलविताना कधीही पेशंटसोबत डॉक्टर जात नाहीत, पण डॉ. पाटील हे आरोग्यसेविकेसह पनवेल येथे जाण्यास निघाले होते, तर तिकडे पनवेलमध्ये पोहचल्यावर एमजीएम रुग्णालयात न नेता पेशंटला आपल्या मित्राच्या दवाखान्यात नेले आणि तिथे बाळंतपणानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बलविंदर सिंग यांनी कर्जत पोलीस ठाण्यात डॉ. रामकृष्ण पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंद केली होती.

कर्जत तालुक्यातील वांजळे येथे राहणारे जसपाल बलविंदर सिंग यांची पत्नी प्रिता सिंग या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या पोटी जन्म झालेल्या बाळाचा आणि नंतर मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉ. पाटील यांनी वैद्यकीय सेवा बजावताना केलेल्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा बळी गेला हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात डॉ. पाटील यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत त्यांच्यावर भा.दं. वि. कलम 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जोगदंड अधिक तपास करीत आहेत.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply