Breaking News

कर्जतमध्ये जमावबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी; धबधबे, धरणे गजबजली

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील धबधबे, धरणे आणि पाणवठे यांसारख्या पर्यटनस्थळांवरील बंदी झुगारून पर्यटकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. या वेळी त्यांना कुणीच रोखले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबईपासून जवळ असल्याने व उपनगरीय लोकलची सुविधा असल्याने कर्जत तालुक्यातील वर्षाकालीन पर्यटनस्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. येथे शनिवार-रविवारी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे दाखल होतात. त्यावर इथला पर्यटन व्यवसायही खुलतो, पण दरवर्षी घडणारे अपघात लक्षात घेता चार वर्षांपासून येथे बंदी लागू करण्यात आली आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचच्या गटाने किंवा अधिक संख्येने येण्यास प्रशासनाने 23 जूनपासून 23 ऑगस्टपर्यंत बंदी लागू केली आहे. असे असतानाही रविवारी कर्जत तालुक्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक दिसून आले. श्रावण महिना सुरू होण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने पर्यटकांची जत्रा भरली होती. लोकल बंद असल्याने पर्यटक आपल्या खासगी वाहनाने आले होते. यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेरील गाड्या होत्या. या वेळी पर्यटकांनी सगळे नियम पाण्यात बुडवून गटारी साजरी केली. त्यांना पोलीस अथवा प्रशासनाने का रोखले नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply