कर्जत ः बातमीदार
इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन देणार्या कोदिवले भागातील शेतकर्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे. परिणामी कोदिवले भागातील शेतकर्यांनी प्रशासनाला 15 दिवसांनंतर शेतकरी आपल्या हक्कासाठी आक्रमक होतील, असा इशारा दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. शेतकर्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. पाइपलाइनसाठी जमीन देणार्या शेतकर्यांना मोबदला न देता फसविले गेले आहे. जो मोबदला शेतकर्यांना सांगण्यात आला त्यानुसार जमिनीचा मोबदला दिला नाही, तर काही शेतकर्यांना जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आला नाही. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पात गेलेल्या जमिनीची नासधूस तसेच कोणतेही शेतीचे उत्पन्न घेता येत नाही.त्यामुळे या अन्यायाविरोधात शेतकर्यांनी दाद मागण्यासाठी कर्जत येथील तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, नरेश कालेकर, उमेश राणे, मंगेश तरे, बाळा शेकटे, अमर मोगरे, तुकाराम तरे, दिनकर सोनावळे यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.
रिलायन्स इथेन गॅस दहेज ते नागोठणे पाइपलाइनमध्ये अवसरे, बीरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पंपलोळी आदी गावांतील अन्यायग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी या लढ्यात सहभागी झाले असून तहसीदारांसह जिल्हाधिकारी तसेच या गॅस पाइपलाइनचे सक्षम अधिकारी पांडुरंग मगदूम यांनाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांत याविषयी कोणताही निर्णय झाला नाही, तर साखळी उपोषण केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.रिलायन्सविरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून त्यात लवकरात लवकर मोबदला दिला जाईल, असे सांगण्यात आले, पण आजतागायत कुठलाही मोबदला आला नाही. बर्याचदा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, मात्र आता आमच्या न्याय हक्कासाठी गुन्हे अंगावर घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण मागे हटायचे नाही, असा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper