पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्यामुळे व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने पनवेलमधील नागरिक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेली विजेची जाचक बिले पुन्हा पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत यासाठी राज्य शासन व विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर दिनांक 4 ऑगस्ट रोजी टाळेबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिला आहे.
कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत
मंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार ना ही, असे आश्वासनदेखील दिले होते, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच आहे.
कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत, पगार नाही. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी या जाचक वीज बिलांचा भार नागरिकांच्या माथी मारण्याचे काम विद्युत मंडळाकडून केले जात आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मूग गिळून शांत बसले आहे, असा आरोपही भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …