प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाचा 15वा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आता रणरागिणीचा अवतार धारण केला आहे. डोळे झाकून बसलेल्या रिलायन्स व्यवस्थापनाबाबत त्या जाहीर निषेध करीत आहेत.
आपल्या न्याय्य मागण्यांची तड लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 13 दिवस उन्हाचा तडाखा आणि रात्री थंडीची हुडहुडी सहन करीत तसेच 14व्या व 15व्या दिवशी मुसळधार पावसाला तोंड देत आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे, मात्र बंदोबस्तासाठी असणार्या पोलीस यंत्रणेव्यतिरिक्त रिलायन्सचे व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा या आंदोलनाकडे ढुंकूनही बघत नसल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठणारच नसल्याचा निर्धार आंदोलनकर्ते वारंवार व्यक्त करीत आहेत.
15व्या दिवसापर्यंत कंपनीत ठेकेदारीच्या कामावर जाणार्या कामगारांना माघारी फिरवण्यात काहीसे यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांना विचारले असता जे कामगार ठेकेदारीतील कामावर जातात व त्यांच्या घरातील माणसांना आंदोलनाच्या ठिकाणी पाठवतात अशा व्यक्तींना त्यांचे प्रकल्पग्रस्त म्हणून असलेले प्रमाणपत्र पुन्हा परत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारपासून या ठेकेदारीतील कामगारांना कंपनीत जाण्यापासून अटकाव करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मिणमिणे यांनी सांगितले.