Breaking News

कोंडीवासीय भोगताहेत मरणयातना; रस्त्याची दुरवस्था; ग्रामस्थ मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत

पाली ः प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे उलटूनही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा येथील नागरिकांना पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. दुर्गम ठिकाणी वसलेले आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे हे गाव आहे. आजही येथील लोक दारिद्य्रावस्थेत जगत मरणयातना भोगत आहेत. गावापर्यंत एसटीची सुविधा नाही. येथून जवळपास चार-साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते, मात्र नागशेत ते कोंडी धनगरवाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता सोडाच, पण जुन्या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. परिणामी आतातरी रस्ता करा, अन्यथा गावकर्‍यांना मोठे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा कोंडी ग्रामस्थांनी दिला आहे.

पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दगडमाती वर आली आहे. येथून चालणेदेखील एक प्रकारचे दिव्यच आहे. खड्ड्यांत रस्ता की रस्त्यावर खड्डे हेच कळत नाही. वाडीतील पुढारी व राजकीय नेते हे रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मागोवा घेत असतील, पळत असतील, शासनाला, आमदारांना भेटत असतील, पण तरी त्यांच्या प्रयत्नांना यश का येत नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. आता निधी मिळाला आहे. आता काम सुरू होणार आहे. लवकरच काम होईल, अशी उत्तरे ऐकून आता कानाला आणि मनाला सवय लावून घ्यावी का, असा सवाल नागरिक करीत आहेत. निधी येणार हे तर सर्वांनी पन्नास वेळा ऐकले असेल, मग तुमचा निधी थांबला कुठे? कुणी अडवला, असा सवाल येथील तरुणांनी उपस्थित केला आहे. येत्या काळात प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष दिले नाही तर कोंडी धनगरवाडा ग्रामस्थ मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.

वर्षानुवर्षे या गावाला चांगला रस्ता नाही. शाळेत जाताना या खडतर मार्गावरून विद्यार्थ्यांना जावे लागते. वृद्ध, आजारी व महिलांचे तर खूपच हाल होतात. रस्त्याबरोबरच चांगल्या सेवासुविधाही येथील गावकर्‍यांना मिळणे गरजेचे आहे.

-राजेंद्र खैरे, शिक्षक, राजिप शाळा, कोंडी धनगरवाडा

कोंडजाई देवी ठाकरे घराण्याचे कुलदैवत आहे. राज ठाकरे कोंडजाई देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील येथे दर्शनासाठी अनेक वेळा आले आहेत, मात्र येथील बिकट रस्त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. राजकारणीही केवळ मतांसाठीच येथे येतात.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply