देशाला स्वातंत्र्य मिळून 70हून अधिक वर्षे झाली आहेत. या सात दशकांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. धीमे-धीमे प्रगती करत करत आपला भारत देश आता नव्या बदलांसाठी सज्ज होत आहे. या देशात इतक्या गोष्टी बदलल्या, परंतु भारतीय राजकारणातील एक गोष्ट मात्र बदलू शकली नाही. ती म्हणजे काँग्रेस पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांचे गांधी परिवारावरील अवलंबित्व. गेली सहा वर्षे काँग्रेसमधील नेतृत्वबदलाचा मुद्दा अधुनमधून चघळला जातो आहे.
सहा-सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन कर्तृत्ववान पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नव्या भारताच्या जडणघडणीसाठी प्रचंड चळवळ उभारली. भारतीय जनतेने प्रचंड प्रतिसाद देत आणि भरघोस मतांची बरसात करून मोदी सरकार वाजतगाजत सत्तेवर आणले. तेथून भारताचा विकास खर्या अर्थाने सुरू झाला आणि वर्षानुवर्षे सत्तेची ऊब घेणारी काँग्रेस रसातळाला जाऊ लागली. पुढे जे घडले ते सर्वांना माहित आहेच. गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु यात त्यांना यश आले नाही. किंबहुना, काँगे्रस पक्ष पुन्हा एकदा साफ तोंडघशी पडला. या अपयशाचे धनी ठरलेल्या राहुल गांधी यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन जणु काही संन्यासच घेतला. एकीकडे अपयशाच्या दरीत कोसळलेल्या या पक्षाचे विघटन सुरूच राहिले. पुढील पक्षाध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसावा अशी आग्रही भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी देखील त्यास अनुमोदन दिले. गांधी परिवारावरील काँग्रेसचे अवलंबित्व तेव्हाच पक्षाला टाळता आले असते. परंतु पक्ष नेत्यांनी पुन्हा एकदा श्रीमती सोनिया गांधी यांच्याच हाती हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे देऊन वेळकाढूपणा मात्र केला. वस्तुत: गांधी परिवाराशिवाय आपले काही अस्तित्व आहे हेच मुळात काँग्रेसजनांना अमान्य असते. एका घराण्याच्या पायी आपल्या सार्या निष्ठा वाहून आपण स्वत:चे, पक्षाचे आणि पर्यायाने देशाचे नुकसानच करीत आहोत याचे भान काँग्रेसजनांना ना कधी होते, ना आहे, आणि ना भविष्यात कधी येईल. याच मानसिकतेचा परिणाम म्हणजे सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी पक्षाची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडेच राहतील अशी व्यवस्था केली गेली. कधी नव्हे ते काँग्रेसमधील तब्बल 23 ज्येष्ठ नेत्यांनी श्रीमती सोनिया यांना पत्र पाठवून काँग्रेसचा संपूर्णत: जीर्णोद्धार करण्याची मागणी केली. पक्षाला कार्यकर्त्यांमध्ये सहज संपर्क असलेला, पूर्णवेळ अधक्ष हवा आणि त्यासाठी पारदर्शकपणे पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्यात अशा प्रकारच्या मागण्या या पत्रात होत्या. तटस्थपणे पाहू गेल्यास या मागण्यांमध्ये काहीही वावगे दिसण्याचे कारण नाही. परंतु या पत्रातील मजकूर काय आहे याचा विचार करण्याऐवजी सोनियाजी इस्पितळात असताना हे पत्र का पाठवले असा चिडखोर सवाल राहुल गांधी यांनी काही ज्येष्ठ नेत्यांना केला. इतकेच नव्हे तर, या पत्रामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप देखील केला. थोडक्यात, गेल्या अनेक वर्षांप्रमाणे काँग्रेसचे ‘ये रे माझ्या मागल्या’ या नाटकाचे प्रयोग यापुढे देखील सुरूच राहणार…