पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा संयोजक जिल्हाध्यक्ष राहुल वैद्य यांनी केले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय ‘आत्मनिर्भर भारत : माझी संकल्पना’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय सण’ असे आहेत. स्पर्धा पनवेल, उरण व कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी मर्यादित व निशुल्क आहे. वयोगट आठवी ते बारावीचे विद्यार्थी असा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाचा स्मार्ट फोनवर केलेला व्हिडीओ पाठवावा. हा व्हिडीओ किमान 5 मिनिटे व कमाल आठ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडीओ मराठी भाषेतच असावा. भाषण स्वरचित असावे. व्हिडीओसोबत संपर्क क्रमांक व आधारकार्ड पाठवणे बंधनकारक आहे. व्हिडिओ पाठवण्यासाठी इ-मेल लर्क्षिीीरळसरवसारळश्र.लेा हा असून, व्हिडीओ पाठवण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन) आहे. विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रु., तृतीय दोन हजार रु. आणि प्रत्येकी पाचशे रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी राहुल वैद्य (9823666990) किंवा संध्या शारबिद्रे (9987851484) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच स्पर्धेचा निकाल ऑनलाइन कार्यक्रमातून जाहीर करण्यात येईल. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होईल व त्याची लिंक सर्व सहभागी स्पर्धकांना पाठविण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.