Breaking News

भाजप, शिवसेनेचे अलिबागेत शक्तिप्रदर्शन

आरडीसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार : अनंत गीते; उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जरा जास्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे, ते भ्रष्टाचाराच्या भस्मासूरला मोठा करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघावे लागेल. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवून त्यांना धडा शिकवणार, असा इशारा शिवसेना-भाजप युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी (दि. 28) अलिबाग येथे दिला.

गीते यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरला. त्यानंतर कुरूळ यथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी  मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावले, निरंजन डावखरे,  म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, विजय कवळे, महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. देश वाचविण्यासाठीच शिवसेना-भाजप युती झाली आहे. देशाला आणि राज्याला भ्रष्टाचार्‍यांपासून वाचविण्यासाठी अनंत गीते यांच्यासारखे खासदार निवडून आले पाहिजेत, असे सुभाष देसाई म्हणाले. 

अनंत गीते यांनी काम केल्यामुळेच ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या वेळीदेखील तेच निवडून येतील, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी त्यांचा शिलेदार म्हणून काम करण्यासाठी अनंत गीते यांना विजयी करा, असे आमदार भरत गोगावले म्हणाले. ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या भूलथापांना बळी पडू नका. प्रत्येकाने आपले काम चोख बजावल्यास अनंत गीते निवडून येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश केला आहे. मला खात्री आहे की, अनंत गीते हेच या मतदारसंघाचा विकास करू शकतील, असे नाविद अंतुले म्हणाले. अ‍ॅड. सुशील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

त्यापूर्वी अनंत गीते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

भाजप-शिवसेनेचे मनोमीलन

शिवसेना-भाजप युती विरुद्ध आघाडी अशी लढत आहे. आमची युती नसून मनोमीलन झाले आहे. आघाडी केवळ राष्ट्रवादी व शेकापच्या नेत्यांची झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची आघाडी झालेली नाही. त्यामुळे या आघाडीला मी मुळीच घाबरत नाही. ही भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी लढत आहे. सहा वेळा खासदार झालो. तीन वेळा केंद्रात मंत्री होतो, परंतु माझ्या चारित्र्यावर डाग नाही, निष्कलंक खासदार म्हणून मला निवडून द्या, असे आवाहन गीते यांनी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply