महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या प्रयत्नांना यश; टंचाईवर मात


कर्जत : बातमीदार
तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी आणि बांगरवाडीमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खाजगी जमीन विकसकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. महसूल अधिकार्यांनी पाणीपुरवठा करण्याबाबत केलेली सूचना जमीन विकसकांनी मान्य केली असून शासनाचे ट्रँकर सुरू होईपर्यंत जमीन विकसक पाणीपुरवठा करणार आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत होता. घुटेवाडी येथील बंधार्यातील दूषित पाणी पिऊन ग्रामस्थ दिवस ढकलत होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी त्या भागातील कर्जत प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे राजेंद्र माने यांना बोलावून घेतले व त्यांना धाबेवाडीमध्ये पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार माने यांनी 5000 लिटर क्षमतेच्या दोन सिंटेक्स टाक्या धाबेवाडी येथे आणून त्या टाकीत दररोज ट्रँकरचे पाणी ओतण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले आहेत. धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील ग्रामस्थांची पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने ग्रामस्थ राजेंद्र माने यांचे आभार मानत आहेत. धाबेवाडीमध्ये बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत ट्रँकरचे पाणी ओतल्यानंतर सरपंच मंगल ऐनकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी ट्रँकर सुरू होइपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन राजेंद्र माने यांनी दिले आहे.
टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव आम्ही जिल्हा प्रशासनाला दिले होते. ते मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच तालुक्याच्या अन्य भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ट्रँकर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत