Breaking News

टाळेबंदी काळात तब्बल साडेतीन कोटींचा दंड वसूल

रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी
टाळेबंदीमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प पडले असताना रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेने तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर अडीच लाख जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. वाहतुकीवर निर्बंध आले. जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वापरावर निर्बंध घातले, मात्र या परिस्थितीतही काही अतिउत्साही नागरिकांनी वाहनाचा वापर सुरूच ठेवला. अखेर वाहतूक पोलिसांनी या वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली. यातून पोलिसांनी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
टाळेबंदीच्या काळात संचारबंदी मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे, वाहने जप्त करणे यावर भर दिला होता, तर संचारबंदी शिथिल झाल्यावर वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई सुरू ठेवली.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात कसूरदार वाहन चालकांवर ई-चलान डिव्हाइसद्वारे एकूण एक लाख 41 हजार 957 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात हेल्मेट परिधान न करणे एक हजार 563, सीटबेल्ट न लावणे 7,813, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे 597, मद्यप्राशन करून वाहन चालविणे 163, इन्सुरन्स नसणे 1045, फॅन्सी नंबर प्लेट 3719, अतिवेगाने वाहन चालविणे 147, काळ्या काचा 353, जादा प्रवासी वाहतूक 170, ट्रिपल सीट 3073, अवैध प्रवासी वाहतूक 38 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर सदराखाली एकूण एक लाख 23 हजार 274 केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एकूण तीन कोटी 50 लाख 41 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply