Breaking News

आत्मनिर्भर भारताच्या वाटेत अडथळा बनणार्‍यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा

चंपारण्य : वृत्तसंस्था

स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 1) चार सभा घेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. चंपारण्यमध्ये मोदींची अखेरची सभा झाली. या वेळी त्यांनी विरोधकांना धडा शिकवण्याचे आवाहन बिहारच्या जनतेला केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, चंपारण्य ही भारताची आस्था व अध्यात्माची भूमी आहे. ही भूमी आपल्या सामर्थ्याला विषद करते. इथे बुद्धांच्या पाऊलखुणा आहेत. येथूनच भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाला नवी दिशा मिळाली होती. चंपारण्य ही बापूंच्या सत्याग्रहाची भूमी आहे. आज संपूर्ण देशाच्या सहकार्याने आणि सहभागातून अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहत आहे, पण अशा वेळीही तुम्हाला त्या लोकांना विसरायचे नाही, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्त्वावरच प्रश्न उपस्थित केले, राम मंदिर उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले. ज्या वेळी जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवण्यात आले, त्या वेळी काही नकारात्मक विचाराचे लोक सांगत होते की, काश्मीरमध्ये आग लागेल, रक्ताचे पाट वाहतील. काय काय बोलून गेले, पण काय झाले. आज जम्मू काश्मीर आणि लडाख शांततेच्या मार्गाने विकासाच्या दिशेने जात आहेत, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.

‘बिहारमध्ये जंगलराजवाले आणि नक्षलवाद समर्थ एकत्र’

मोतिहारी : वृत्तसंस्था

बिहारमध्ये पूर्वी जंगलराजची अवस्था होती. आता तर या निवडणुकीत जंगलराजवाल्यांसोबत नक्षलवादाचे समर्थक आणि देशाचे तुकडे तुकडे पाडू इच्छिणारेदेखील सामिल झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. मोतिहारी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, बिहारच्या महिला, माता-भगिनींना उघड्यावर शौचाला जायला लागायचे. त्यांच्या सुरक्षेला धोका होता, मात्र या जंगलराजवाल्यांना जंगलासारखीच स्थिती हवी होती. एनडीएच्या सरकारने बिहारच्या माता-भगिनींसाठी लाखो शौचालये बनवून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. जंगलराजचा तो अंधार आता बिहारने मागे टाकला आहे. आता नव्या उजेडासह डबल इंजिनच्या ताकदीने विकासाचा लाभ आपल्याला बिहारच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवायचा आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी सांगितले की, बिहारच्या युवकांसाठी बिहारमध्येच चांगला आणि सन्मानजनक रोजगार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. बिहारला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येकाचे मत एनडीएला म्हणजेच भाजप, जेडीयू, हम पार्टी आणि व्हीआयपी पार्टीच्या उमेदवारांना मिळायले हवे.

कोरोना काळात सुविधा उपलब्ध केल्या

कोरोनाचे संकट जेव्हापासून देशात आले तेव्हा सर्वांत आधी खेडोपाड्यातील गरीब आणि शेतकर्‍यांच्या हिताचा विचार केला गेला. कोरोनाचे हे संक्रमण ग्रामीण भागात पोहचू नये यासाठी योग्य वेळीच लॉकडाऊन लावला गेला. गरीब परिवारांना उपाशी झोपायला लागू नये म्हणून दिवाळी आणि छट्पूजेपर्यंत मोफत रेशनची सोय उपलब्ध केली. बिहारची जी कामगार कुटुंब दुसर्‍या राज्यातून परतली आहेत त्यांच्या रेशन धान्यापासून ते रोजगारापर्यंतच्या सर्व गोष्टी गरीब कल्याण रोजगार अभिनयानाद्वारे चालवल्या गेल्या. लॉकडाऊनदरम्यान शेतकर्‍यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply