Breaking News

पनवेल एसटी बसस्थानकात भाजपची जोरदार निदर्शने

  • राज्य सरकारकडून जनतेची सातत्याने फसवणूक -आमदार प्रशांत ठाकूर
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील जनतेची सातत्याने फसवणूक केली आहे. या सरकारचा कारभारच निष्क्रिय आहे. त्यामुळे स्वतःला राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणवून घेणारे, मात्र तसे कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 10) येथे केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार शिवाय तोही थकल्याने जळगाव येथील एसटी कर्मचारी मनोज चौधरी व रत्नागिरी येथील पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांना महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असून, त्या विरोधात पनवेल एसटी बसस्थानकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या वेळी महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या निदर्शनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, प्रभाग समिती ’क’ सभापती समीर ठाकूर, नगरसेवक संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, विनोद घरत, रवींद्र नाईक, अमरिश मोकल, योगेश लहाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, एकीकडे कोरोनाचे संक्रमण आहे आणि संक्रमणाच्या काळात जगामध्ये आपला भारत देश वेगवेगळी सकारात्मक पावले उचलून आपल्या कार्यक्षमतेचे उदाहरण देत आहे. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मात्र अकार्यक्षम आणि कुचकामी ठरले आहे. याचा फटका राज्यातील नागरिकांना बसतोय. एसटी कर्मचार्‍यांना चार चार महिने पगार दिला नाही आणि त्यामुळे या कर्मचार्‍यांना आत्महत्या करावीशी वाटली. एसटी कर्मचार्‍यांना आधार देण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचे कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख म्हणून सांगतात. त्यांचीही ही जबाबदारी होती. जर ते त्यांच्या जबाबदारीपासून बाजूला जात असतील तर हे चित्र महाराष्ट्रासाठी आशादायक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भाने आपण अभिमानाने बोलतो त्या पुरोगामी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यातील दोन पक्ष वर्षानुवर्षे सत्तेत आहे, तर एक पक्ष आता नव्याने नेतृत्व करू लागला आहे आणि त्यांना घोड्यावर बसवून बाकीचे लोकं मजा बघत असून, राज्यात सत्तेचा पोरखेळ चालला आहे.
एकीकडे कर्मचार्‍यांना आश्वस्त करायचे आणि मागे फिरायचे हे काही योग्य चाललेले नाही. अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकाराला आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिले म्हणून थेट अटक केली. मग आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये त्यांनी मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. मग मुख्यमंत्री आता अनिल परब यांना अटक करणार का? नैतिकता थोडी तरी शिल्लक असली तर परब यांचा राजीनामा घेणार का? आणि तो घेणार नसतील तर असे ढोंग अशा पद्धतीने चालवू नये, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुनावले.
महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे एका कार्यक्षम सरकारची अपेक्षा आहे. या राज्याला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे, मात्र ती महाविकास आघाडीकडून पूर्ण होताना दिसत नाही असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एसटी कर्मचारी मनोज चौधरी, पांडुरंग गडदे या आमच्या सहकार्‍यांनी आत्महत्या केली ही चिंतेची बाब असून, एसटी कर्मचार्‍यांसाठी काळी दिवाळी साजरी करायला हे सरकार भाग पाडत आहे. या सरकारचा धिक्कार करू तेवढा कमी आहे. सर्वसामान्य जनता रोज रस्त्यावर उतरू लागली आहे. याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारला जनतेला द्यावा लागेल, असेही त्यांनी अधोरेखित करून राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

मंत्र्यांना गाडी, बंगले पण इमानेइतबारे लालपरीच्या माध्यमातून प्रवाशांची सेवा करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना पगार दिला जात नाही. आपल्या आत्महत्यानंतर तरी या ठाकरे सरकारला जाग येईल, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले. ठाकरे सरकारच्या जुलमी कारभारात एसटी कर्मचारी शहीद झाले आहेत. या निष्किय सरकारचा निषेध करू तेवढा कमी आहे.
-राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष, पनवेल तालुका भाजप मंडल

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढले म्हणून पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर जुनी केस चालवली. या सरकारने निष्क्रियतेचा कळस गाठला आहे. एसटी कर्मचार्‍यांना मृत्यूच्या दारात ढकलणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो. तिघाडी सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.
-मयुरेश नेतकर, अध्यक्ष, उत्तर रायगड भाजप युवा मोर्चा

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply