Breaking News

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांकाने गौरव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान

पनवेल  रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविणार्‍या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 5) मुंबईत झालेल्या सोहळ्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. 21 लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. हा सन्मान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संचालक परेश ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी स्वीकारला.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एनसीपीए हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, शिक्षण विभाग आयुक्त सूरज मांढरे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, आमदार राजेश पाटील, विक्रम काळे, गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रवीण पटेल यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रथमच राज्यात आयोजित करण्यात आलेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. राज्यातील एक लाख तीन हजार 312 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हे अभियान उदंड केले. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे विविध प्रकारचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभागासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक उपक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे राबवले.
या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले होते. उज्ज्वल यशाची परंपरा असलेल्या आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रायगड, नवी मुंबईतील प्रतिष्ठित अशा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने या अभियानात सहभाग घेतला होता. सर्वांगीण शिक्षण विकास, शिस्तबद्ध, अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असलेल्या या विद्यालयाने अभियानाच्या सर्व निकषानुसार जबाबदारी यशस्वीरित्या बजावली आणि मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावत रायगड, नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला होता. आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा रायगड व नवी मुंबईला शिक्षण क्षेत्रात उच्चस्थानी नेण्यासाठी देदीप्यमान कामगिरी केली आहे.

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply