ठाणे : प्रतिनिधी
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (दि. 24) छापा टाकला. याशिवाय त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल होऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई झाली. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी तसेच कार्यालयात शोधमोहीम सुरू आहे. या अंतर्गत दिल्लीतील टीमच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे परिसरात एकूण 10 ठिकाणी शोध सुरू आहे. आमदार प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचे नाव 1989पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये आहेत. त्यांनी अनेक रहिवासी प्रकल्प उभारले आहेत. घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. सरनाईक यांनी 2019 साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता 125 कोटींहून अधिक आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …